विश्वचषक विजेत्या संघावर बीसीसीआयकडून बक्षिसांचा वर्षाव
मनजोत कालराने अंतिम सामन्यात केलेलं शतक आणि त्याला इतर भारतीय फलंदाजांनी दिलेली मोलाची साथ या जोरावर भारताने १९ वर्षाखालील विश्वचषक आपल्या नावावर केला आहे. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून मात करत भारताने चौथ्यांदा १९ वर्षाखालील चषक जिंकला आहे. अंतिम सामन्यात विजयासाठी भारतासमोर ऑस्ट्रेलियाने २१७ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचं हे आव्हान २ गड्यांच्या मोबदल्यात लिलया पार केलं. भारताच्या या विजयावर खूश होत बीसीसीआयने भारतीय खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव केला आहे. बीसीसीआयने प्रशिक्षक राहुल द्रविडला ५० लाख रुपये, प्रत्येक खेळाडूला ३० लाख रुपये आणि सपोर्ट टीममधील प्रत्येक सदस्याला प्रत्येकी २० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
यावेळी भारतीय डावाचा हिरो ठरला तो सलामीवीर डावखुरा फलंदाज मनजोत कालरा. कालराने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्लोबोल करत शतक झळकावलं. त्याला हार्विक देसाई, शुभमन गिल आणि कर्णधार पृथ्वी शॉ या खेळाडूंनीही तितकीच मोलाची साथ दिली. भारताच्या एकाही फलंदाजाला मोठे फटके खेळण्यापासून रोखणं ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना जमलं नाही. संपूर्ण स्पर्धेत धावांचा रतिब घालणाऱ्या शुभमन गिलला मालिकावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. या विजयानंतर संपूर्ण देशभरातून भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Add new comment