लाइव न्यूज़
बीडमधील बॅनरबाजीला चाप; प्रिंटींगवाल्यांना पालिकेची तंबी ; स्टेडीयम परिसरातील बॅनरही हटविले
Beed Citizen | Updated: February 3, 2018 - 3:08pm
बीड (प्रतिनिधी) शहरातील बॅनरबाजीला चाप लावण्याच्या दृष्टीने पालिकेने ठोस पावले उचलली आहेत. दोन दिवसापूर्वी स्वच्छता निरीक्षक जाधव यांनी स्टेडीयम परिसरातील बॅनर हटवून कारवाईला सुरूवात केलेली आहे. त्यानंतर मुख्याधिकार्यांनी ग्राफिक्स आणि प्रिंटींगवाल्यांना नोटीस बजावून पालिकेची किंवा संबंधीत पोलिस ठाण्याची परवानगी असल्याशिवाय बॅनरची छपाई (प्रिंट करू नये) अशी तंबी दिल्याने खळबळ उडाली आहे.
बीड पालिकेने बॅनरबाजीविरूध्द कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. पोस्टर्स, बॅनरमुळे सार्वजनिक जागेचे आणि शासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरण होत असल्याने बॅनर हटवण्याची कारवाई केली जात आहे. याच संदर्भात मुख्याधिकार्यांनी शहरातील ग्राफिक्स आणि प्रिंटींग प्रेस वाल्यांना नोटीसा बजावल्या आहेत. नगर परिषद कार्यालय किंवा संबंधीत पोलिस ठाण्याची परवानगी असल्याशिवाय बॅनर छपाई (प्रिंट) करू नये. अशी तंबी देत विनापरवाना पोस्टर्स, बॅनर (प्रिंट) छापल्याचे निदर्शनास आल्यास आपणाविरूध्द शहर विद्रुपीकरण कायदा १९५ चे कलम (१)(२) नुसार गुन्हा नोंद करण्यात येईल असा इशाराही दिला आहे. शहरातील सर्व पोलिस ठाणे आणि पोलिस अधिक्षकांनाही माहितीस्तव प्रत सादर करण्यात आली आहे.
दुखणं म्हशीला अन् इंजेक्शन पखालीला!
बीड नगर पालिकेने बॅनरबाजीला चाप बसवण्याच्या दृष्टीने सुरू केलेली कारवाई कौतुकास्पद आणि नागरीकांच्या हिताची आहे. मात्र कारवाई करत असताना दुखणं म्हशीला अन् इंजेक्शन पखालीला असाच काहीसा प्रकार होत असल्याची चर्चा होवू लागली आहे. अनाधिकृत बॅनर लावणार्यांविरूध्द कारवाई होणे साहजिकच आहे आणि व्हायलाही हवी. परंतू ग्राफिक्स आणि प्रिंटींग प्रेस वाल्यांना तंबी आणि गुन्हा दाखल करण्याचा इशारा देणे म्हणजे त्यांच्या पोटावर पाय देण्यासारखेच आहे. कुठल्याही प्रकारचे बॅनर किंवा पोस्टर छापायचे झाल्यास पालिका किंवा पोलिस प्रशासनाच्या परवानगीची वाट त्यांना पहावी लागत असल्याने व्यावसायीकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
Add new comment