पोरवाल दाम्पत्यांने दत्तक घेतलेल्या चिमुकलीचे  शेकडो भाविकांच्या उपस्थितीत नामकरण 

बीड(प्रतिनिधी)बीड तालुक्यातील नेकनूर येथील स्त्री कुटीर रुग्णालयात प्रसुतीदरम्यान मातेचा मृत्यू झाला. मातृछत्र हरपलेल्या त्या चिमुकलीचा सांभाळ करण्यास असमर्थ ठरलेल्या पित्याने जड अंतःकरणाने तिला अनाथाश्रमात सोडण्याचा निर्णय घेतला होता, पण महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने पुढाकार घेऊन त्या चिमुकलीला आई-वडिलाचे छत्र मिळवून दिले अन् बीड येथील प्रशांत पोरवाल व त्यांच्या पत्नी सौ.बरखा प्रशांत पोरवाल यांनी चिमुकलीचे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन दत्तकत्वही स्विकारले. या चिमुकलीचा नामकरण सोहळा’ शुक्रवार दि.2 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 5 वाजता शहरात लोकसहभागातून सुरु असलेल्या नारदीय कीर्तन महोत्सवात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी शेकडो महिला-पुरुषांनी टाळ्यांचा कडकडाट करत चिमुकल्याच्या नामकरणाचा आनंदोत्सव साजरा केला. बीडमध्ये नामकरणाचा असा सोहळा प्रथमच पार पडला.‘प्रांशी’ असे चिमुकलीचे नामकरण करण्यात आले.

नेकनूर येथील रामलिंग सांगळे यांची पत्नी मीना यांचा नेकनूर स्त्री रुग्णालयात प्रसुतीनंतर दुर्दैवी मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर हतबल झालेल्या पित्याने तिचा सांभाळ करण्यास असमर्थता दाखवली. निरागस चिमुकलीला अनाथाश्रममध्ये सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला.पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसंत मुंडे, मार्गदर्शक संतोष मानूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी,जिल्हा सचिव शेख वसीम, संघटक अमजद खान, सहसंघटक शेख अय्युब आदींनी पुढाकार घेऊन चिमुकलीला प्रशांत आणि बरखा पोरवाल या दाम्पत्यांच्या माध्यमातून माता-पित्याचे’ प्रेम मिळवून दिले. दरम्यान या चिमुकलीचा बीड शहरातील जिजामाता चौक, मसरतनगर येथे दि.25 जानेवारीपासून लोकसहभागातून सुरु असलेल्या नारदीय कीर्तन महोत्सवात आयोजीत अयोध्याधाम येथील बालव्यास स्वामी श्री दुर्गेशजी महाराज यांच्या श्रीरामकथेच्या सांगतेप्रसंगी शुक्रवार दि.2 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 5 वाजता शेकडो महिला-पुरुषांच्या उपस्थितीत नामकरण सोहळा पार पडला. याप्रसंगी उपस्थितांना घुगर्‍या वाटप करण्यात आल्या. सभामंडपात सजवलेल्या पाळण्यात प्रांशीला ठेवून पाळणा गीते गात नामकरण सोहळा संपन्न झाला. 

याप्रसंगी संयोजन समितीच्या वतीने गौतम खटोड, पारसमल बोरा, योगेश बोरा, सिध्दार्थ मुनोत, शुभम खटोड, आशिष खटोड, संतोष मुळे आदींच्या हस्ते मुलीच्या दत्तकत्वासाठी पुढाकार घेत पोरवाल कुटूंबियांना मुलीचे दत्तकत्व मिळवून देणारे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी,जिल्हा सचिव शेख वसीम,संघटक अमजद खान, सहसंघटक शेख अय्युब यांचा शाल,श्रीफळ देवून यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच मुलीचे पालक प्रशांत पोरवाल यांना व ज्यांनी मोठ्या भावनेने मुलीला दत्तक निर्णय घेतला ते रामलिंग साळवे यांना पुर्ण पोशाख भेट देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित भाविकांना नामकरण सोहळ्यानिमित्त बालूशाहीचा प्रसाद वाटप करण्यात आला. याप्रसंगी लोकसहभागातून मुलीच्या मातेचा (सौ.बरखा पोरवाल) यांचा निर्मलाताई खटोड, उज्वलाताई मुनोत यांच्या हस्ते साडी-चोळीची भेट देवून सत्कार करण्यात आला तर मुलीला सोन्याची चैन, चांदीचे वाळे, चांदीचे पैंजण, पाळणा-खेळणी व भेटवस्तू देण्यात आल्या. नारदीय कीर्तन महोत्सवात संपन्न झालेल्या या आगळ्यावेगळ्या सोहळ्याने उपस्थित माता-भगिणींच्या डोळ्यात आनंदाआश्रू तरळले होते. संयोजन समिती पदाधिकार्‍यांच्या या सामाजिक कार्याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त करत कौतूक केले.संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन अनंत देवा कुलकर्णी यांनी करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.