ऑस्ट्रेलियास धास्ती भारताच्या वेगवान गोलंदाजांची

ख्राईस्टचर्च : भारताविरुद्धच्या सामन्याची पूर्वतयारी आणि त्या वेळी फिरकीऐवजी जलदगती गोलंदाजांबाबत जास्त चर्चा, याची आम्हाला काय कोणालाच सवय नसेल. भारताचे हे वेगवान गोलंदाजच आमच्यासाठी आव्हान असतील, असे ऑस्ट्रेलियाचे मुख्य मार्गदर्शक रायन हॅरीस यांनी सांगितले. विश्‍वकरंडक 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील विजयी सुरवात भारताने ऑस्ट्रेलियास हरवून केली होती. आता ऑस्ट्रेलियासच नमवून मोहिमेची विजयी सांगता करण्याचा पृथ्वी शॉच्या संघाचा इरादा आहे. या स्पर्धेत सातत्याने ताशी 140 किमी वेगाने मारा करणाऱ्या कमलेश नागरकोटी आणि शिवम मावी यांनी प्रतिस्पर्ध्यांना हादरवले आहे. ऑस्ट्रेलिया संघ याची कबुली देत आहे. त्यांचे प्रशिक्षक म्हणाले, "भारतीय गोलंदाज सातत्याने 135 ते 140 च्या वेगाने मारा करत आहेत. आमच्या फलंदाजांना यास सामोरे जाण्याचा सरावही नाही. हे जबरदस्त आव्हान आहे.

 

भारतातून जलदगती गोलंदाज पाहून खूप आनंद वाटला. आम्ही नेहमी भारतातील फिरकी गोलंदाजांबद्दल बोलत असतो. आता तेथूनच चांगले वेगवान

 

 

 

 

      गोलंदाज तयार झाले आहेत.'' अंतिम सामन्यापूर्वीच्या ब्रेकचा कांगारूंनी चांगलाच उपयोग करून घेतला आह. त्यांनी भारताच्या सामन्यांचा सखोल अभ्यासही केला आहे. भारताची मधली फळी काहीशी कमकुवत आहे. त्याला हादरे देता येऊ शकतात, हा विश्‍वास त्यांना वाटत आहे. शुभम गिलमुळे डाव पूर्ण कोलमडत नाही; पण फिनिशर समजला जात असलेला रियान पराग पूर्ण तंदुरुस्त नाही. झिंबाब्वेविरुद्ध हार्विक देसाई ऐनवेळी मदतीस धावून आला होता, याचीही कांगारूंना जाणीव झाली आहे. भारताच्या आघाडीच्या जोडीस लवकर फोडल्यास आम्हाला नक्कीच संधी असेल. भारताच्या मधल्या तसेच तळाच्या फलंदाजांचा अद्याप कस लागलेला नाही. "भारतीय संघ बहरात आहे; पण त्यांना हादरे देता येऊ शकतात. भक्कम सुरवातीपासून त्यांना रोखले. त्यानंतर दडपण कायम ठेवणे हे आमचे लक्ष्य असेल,' असे हॅरीस यांनी नमूद केले.सलामीच्या लढतीत भारताने सव्वातीनशे धावांचा तडाखा दिला होता. त्यातच ऑस्ट्रेलियाची फलंदाजी अजून पूर्णपणे बहरात आलेली नाही. "आम्ही या लढतीत अंडरडॉग्ज आहोत, हे मान्य; मात्र त्याचवेळी आम्हाला सलामीच्या लढतीतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. ही बाब संघाला नक्कीच प्रेरणादायक आहे,' असे सांगत हॅरीस खेळाडूंचा आत्मविश्‍वास उंचावण्याचा प्रयत्न करत होते. 

 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.