मंत्रालयातील सरपंच दरबारामुळे ग्रामीण प्रश्नाला मिळाले हक्काचे व्यासपीठ - दोनशे सरपंचांनी मांडले विविध प्रश्न ग्रामविकासाची चळवळ गतिमान करण्याचे ना पंकजाताई मुंडे यांचे आवाहन
मुंबई, दि. १ ------ मंत्रालयात ग्रामविकास विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या सरपंच दरबारास आज भरीव प्रतिसाद मिळाला. राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या सरपंच दरबारास राज्याच्या सर्व भागातील साधारण २०० सरपंचांनी उपस्थिती लावून त्या त्या भागातील विविध प्रश्न मांडले.
सरपंचांशी थेट संवाद साधण्याच्या उद्देशाने मंत्री पंकजा मुंडे यांनी मागील महिन्यापासून सरपंच दरबार हा अनोख उपक्रम सुरु केला आहे. दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी हा सरपंच दरबार होतो. आजचा हा दुसरा सरपंच दरबार होता. यात सहभागी सरपंचांनी विशेष करुन घरकुल योजनेत येणाऱ्या अडचणी, चौदाव्या वित्त आयोगातून मिळणारा निधी, ग्रामसभांमधील प्रश्न, ग्रामपंचायतींसाठी आवश्यक असलेले अधिकचे मनुष्यबळ, सरपंचांची मानधनवाढ, ग्रामपंचायतींसाठी इमारतींची आवश्यकता असे विविध प्रश्न यावेळी मांडले. नव्याने नियुक्त महिला सरपंचांनीही गावातील विविध प्रश्न यावेळी मंत्र्यांसमोर सादर केले.
भरीव निधीतून गावांचा सर्वांगिण विकास करा
-------------------------
ना. पंकजाताई मुंडे यावेळी म्हणाल्या की, ग्रामीण भागातील प्रत्येक बेघराला घर देण्याचा सरकारचा निर्धार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून हे लक्ष्य पूर्ण केले जाईल. गोरगरीबांना स्वत:चे घर मिळवून देण्याच्या उद्देशाने शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून अनधिकृत झोपड्या नियमीत केल्या जातात. त्याच धर्तीवर गावांमध्ये शासकीय जागांवर अनेक वर्षांपासून राहणाऱ्या लोकांची अतिक्रमीत घरे नियमीत करण्याचा क्रांतिकारी निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पंडीत दीनदयाळ उपाध्याय योजनेतून लोकांना जागा खरेदीसाठी अनुदान दिले जात आहे. ग्रामीण भागातील गृहनिर्माणाची चळवळ गतिमान केली जात आहे. चौदाव्या वित्त आयोगातून मोठा निधी गावांना उपलब्ध करुन दिला जात आहे. गावे ब्रॉडबँड तथा वाय-फायने जोडण्याची योजना शासनाने हाती घेतली आहे. स्वच्छता, मनरेगा यासाठीही भरीव निधी गावांना मिळत आहे. या सर्व योजनांचा लाभ घेऊन सरपंचांनी गावांचा सर्वांगीण विकास करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सरपंचांनी आज मांडलेल्या सर्व प्रश्नांवर तसेच सादर केलेल्या सर्व निवेदनांवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
सरपंच दरबारास ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्याच्या विविध भागातून आलेले सरपंच भास्कर पेरे – पाटील, डॉ. सूरज पाटील, अनंत ठाकरे, नरेंद्र पाटील, रेश्मा देशमुख, संतोष राणे यांनी सरपंचांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.
Add new comment