नाळवंडीच्या डॉक्टटरवर जामखेड मध्ये गोळीबार दोघे जखमी
जामखेड/पाटोदा (प्रतिनिधी) स्कॉर्पिओमधून आलेल्या अज्ञात पाच ते सहा जणांनी अंधाधुंद गोळीबार केल्याने डॉ.सादेक पठाण (रा.नाळवंडी ता.पाटोदा) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यासोबत गाडीमधील कय्युम शेख यांना देखील एक गोळी लागली आहे. सदरिल घटना जामखेड येथील पंचायत समिती कार्यालयासमोर आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या दोघांवर प्राथमिक उपचार करून त्यांना अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान नाळवंडी (ता.पाटोदा) येथे डॉ.सादेक पठाण यांच्या वडिलांवरही सशस्त्र हल्ला झाला असून त्यांनाही नगरच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन महिन्यापूर्वी ग्रामपंचायत निवडणूकीच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी अंमळनेर (ता.पाटोदा) पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. जामखेड येथील पंचायत समिती कार्यालयासमोर आज भरदूपारी गोळीबाराची घटना घडली. डॉ.सादेक पठाण (रा.नाळवंडी ता.पाटोदा) हे स्वत:च्या कार क्र.(एम.एच.२३ ई.४२८९) मधून नाळवंडीकडे येत असतांना पंचायत समिती कार्यालयासमोर स्कॉर्पिओ (क्र.एम.एच.१२ जे.सी.६३७२) मधून आलेल्या पाच ते सहा जणांनी डॉ.पठाण यांच्या दिशेने गोळीबार केला. अज्ञात लोकांनी पाच गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी डॉ.पठाण यांच्या मांडीला लागली असुन एक गोळी गाडीत बसलेले कय्युम शेख (मेडिकल चालक) यांना लागली आहे. त्यानंतर हल्लेखोरांनी डॉ.पठाण यांच्या गाडीची तोडफोड केली. या प्रकारानंतर जामखेड शहरात दहशतीचे वातावरण पसरले होते. हल्लेखोरांच्या गोळीबारात जखमी झालेले डॉ.सादेक पठाण आणि कय्युम शेख दोघांवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर रूग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती कळताच डिवायएसपी सुदर्शन मुंडे यांनी सहकार्यांसह घटनास्थळी भेट देवून अतिरिक्त बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान डॉ.सादेक पठाण यांचे वडिल जानुलाल पठाण यांच्यावरही आज सकाळी डोंगरकिन्ही जवळील मळेकरवाडी घाट येथे अज्ञात हल्लेखोरांनी नाळवंडी (ता.पाटोदा) येथे सशस्त्र हल्ला चढवला. तसेच गाडीने धडक देवून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचेही वृत्त आहे. गोळीबाराच्या आणि हल्ल्याच्या घटनेने खळबळ उडाली असुन दोन महिन्यापूर्वी नाळवंडी येथे ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती. या निवडणूकीत डॉ.सादेक पठाण यांचे बंधु डॉ.एकबाल पठाण यांचे पॅनल होते. त्यामध्ये सरपंच पदासह अन्य चार सदस्य पठाण यांच्या पॅनलचे निवडून आले होते. त्याच रागातून विरोधी गटातील पॅनलच्या लोकांनी हा हल्ला केल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अंमळनेर (ता.पाटोदा) येथील पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असुन दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती
. पंधरा दिवसांपूर्वी एसपींसह स्थानिक पोलिसांना निवेदन देवूनही दखल नाही
पाटोदा तालुक्यातील नाळवंडी येथील ग्रामपंचायत निवडणूकीच्या कारणावरून पराभूत झालेल्या प्रतिस्पर्धी गटाकडून सातत्याने वाद घातला जात होता. याच कारणावरून गोळीबारात जखमी झालेले डॉ.सादेक पठाण यांचे बंधु डॉ.एकबाल पठाण यांनी बीड पोलिस अधिक्षकांना आणि अंमळनेर पोलिस निरीक्षकांना निवेदन देवून शिवाजी केशव काकडे (रा.नाळवंडी ह.मु.पाटोदा) यांच्यापासून आपल्या कुटूंबियांच्या जिवाला धोका असून त्यासंदर्भात कारवाई करावी अशी मागणी केली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर गोळीबार आणि वडिलांवरील हल्ल्याची घटना टळली असती अशी प्रतिक्रिया डॉ.एकबाल पठाण यांनी दिली आहे. दरम्यान बीड पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अन्य जिल्ह्यात याच प्रकरणावरून गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.
Add new comment