बीड जिल्ह्यात कांद्याचं गाव! अख्या गावांने घेतले २५ कोटींचे उत्पन्न

बीड (प्रतिनिधी) गावाची संस्कृती हे गावाचे व्यक्तीमत्व असे म्हटले जात असले तरी तेथील ग्रामस्थांनी शेतात राब राब राबुन घाम टपकावत मिळवलेली ओळख वाखानण्याजोगी असते. याची प्रचीती बीडसांगवी (ता.आष्टी) येथे येवू लागली आहे. पाच वर्ष भयानक दुष्काळाने छळल्यानंतर तेथील शेतकर्‍यांनी आता कुठे उभारी घेतली आहे नव्हे तर झेप घेतल्याचे स्पष्ट होवू लागले आहे. अख्या गावानेच कांद्याच्या पिकाचे उत्पादन घेत कोटींची मजल मारली आहे. सरपंच सोनबा नरवडे, उपसरपंच विजय डुकरे आदिंनी तेथील शेतकर्‍यांच्या माध्यमातून ही अत्याधुनिक क्रांती करत ‘कांद्याचं गाव’ म्हणून ओळख मिळवली आहे.
आष्टी तालुक्यातील बीडसांगवी गावामध्ये शंभर टक्के लोक शेती करतात. पाच वर्ष दुष्काळाने छळल्यानंतर येथील शेतकर्‍यांनी यावर्षी मात्र अनोखा उपक्रम राबवला. गतवर्षी झालेल्या दमदार पावसाने नदी-नाले तुडूंब भरले. तलावातही भरपूर साठा झाला. त्याचा लाभ उठवत येथील शेतकर्‍यांनी सरसकट कांद्याची शेती करण्याचा निर्णय घेतला. आणि तेथूनच एका नव्या हरित क्रांतीची सुरूवात झाली. एका-एका शेतकर्‍याने तब्बल वीस लाखांचे उत्पन्न घेत आर्थिक भरभराट साधली. यावर्षी अख्या गावानेच कांदा उत्पादनातून पंचवीस कोटी रूपयांचे उत्पन्न घेवून राज्यासमोर एक नवा पॅटर्न उभा केला आहे. अशी माहिती सरपंच सोनबा नरवडे, उपसरपंच विजय डुकरे, सदस्य दिवटे, युवा नेते प्रविण दिवटे व शेतकर्‍यांनी सिटीझनशी बोलतांना दिली. पुढील दोन महिन्यात आणखी मोठ्या जिद्दीने कांदा उत्पादन घेवून बीडसांगवी हे कांद्याचे गाव म्हणून नावलौकीक मिळवेल असा विश्‍वास सरपंच सोनबा नरवडे यांनी सांगितले. 
 
कांदा चाळीची प्रतिक्षा!
आष्टी तालुक्यातील बीडसांगवी गाव कांद्याचं गाव म्हणून नावारूपास येत आहे. येथील शेतकर्‍यांनी सरसकट कांद्याचे उत्पादन घेत गावाला नवी ओळख दिली असून आर्थिक स्थैर्यही उंचावत आहे. अशा परिस्थितीमध्ये येथील ग्रामस्थांना साथ हवीय ती प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची. याठिकाणी कांदा साठा करण्यासाठी कांदाचाळीची गरज असून याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
 
भाव न मिळाल्याने टाकला होता सडा!
आष्टी तालुक्यातील मातावळी, चिंचपुर फाटा येथील शेतकर्‍यांनी भाव न मिळाल्याने रस्त्यावरच कांद्याचा सडा टाकला होता. काही महिन्यापूर्वीच्या या प्रकारामुळे बीडसांगवीच्या ग्रामस्थांनी अगदी वेळेवर कांद्याचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासूनच बीडसांगवीत कांदा शेतीला बहर आला.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.