युतीचा धर्म प्रामाणिकपणे पाळला ; सरकारने गांभिर्याने विचार करावा - आ. मेटे
महामंडळ, मंत्रिमंडळ विस्तार संदर्भात मुख्यमंत्र्यासोबत चर्चा ; सन्मान न झाल्यास सरकारवर परिणाम होतील
बीड ( प्रतिनिधी )
आगामी मंत्रिमंडळ विस्तार आणि विविध महामंडळावरील नियुक्त्या संदर्भांत शिवसंग्रामचे आ. विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केली. आम्ही भाजपसोबत प्रामाणिक पणे युती धर्म पाळत असून सरकारने त्याचा गांभीर्याने विचार करावा. सहयोगी घटक पक्षांचा सरकारमध्ये योग्य सन्मान न झाल्यास त्याचा परिणाम सरकारवर होईल असा इशाराही शिष्ट मंडळाने मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टमंडळासह भेट घेतली . आम्ही प्रामाणिकपणे सरकार सोबत काम करीत आहोत मात्र आम्हाला न्याय मिळत नसल्याची खंत शिष्ट मंडळाने फडणवीस यांच्यासमोर व्यक्त केली. यावर मुख्यमंत्र्यांनी लवकरच अन्याय दूर होईल, असे शिष्टमंडळाला अश्वस्त केले. विविध महामंडळावरील नियुक्त्या लवकरच करण्यात येणार असल्याच्या अनुषंगाने आ. मेटे यांनी कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी या महामंडळावर शिवसंग्रामला स्थान द्यावे, अशी मागणी यावेळी लावून धरली. शिवाय आम्ही भाजपसोबत प्रामाणिक पणे युती धर्म पाळत असून सरकारने त्याचा गांभीर्याने विचार करावा. सहयोगी घटक पक्षांचा सरकार मध्ये योग्य सन्मान न झाल्यास त्याचा परिणाम सरकारवर होईल असा इशारा ही शिष्ट मंडळाने मुख्यमंत्र्यांना दिला आहे. या शिष्टमंडळात आमदार विनायक मेटे यांच्यासह आ. भारतीताई लव्हेकर, भारतीय संग्राम परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे, युवक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के, विक्रांत आंबरे, संदीप पाटील, दिलीपराव माने, शिवा मोहोड यांची उपस्थिती होती.
दूध दर संदर्भात चर्चा
राज्यातील दूध उत्पादक प्रचंड अडचणीत असून त्यांना दुधाचा योग्य मोबदला मिळावा. दूध खरेदी करणारे सामान्य नागरिक आणि खाजगी, सहकारी व शासकीय दूध संस्थांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांच्या दरामध्ये प्रचंड दरी आहे. ही तूट भरून काढली जाईल असा दर दूध उत्पादकांना द्यावा, असेही आ. मेटेनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
आरक्षणाचा निर्णय घ्या- आ. मेटे
मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षणाचा प्रश्न सरकारने गांभीर्याने घ्यावा. मराठा समाजाच्या वसतिगृहाचे प्रश्न तातडीने निकाली काढावेत. जनमत सरकारच्या विरोधात तयार होत आहे. हे प्रश्न सरकारने तातडीने सोडवावेत असेही आ. विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना चर्चे दरम्यान लक्षात आणून दिले.
Add new comment