अस्मिता योजनेस मंत्रिमंडळाची मान्यता ; प्रचार प्रसिध्दीच्या वार्षिक खर्चास 1 कोटी रुपये ; ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती

मुंबई, दि.30..राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलींना मिळणार पाच रुपयात सॅनिटरी नॅपकीन तसेच राज्यातील ग्रामीण भागातील महिला व 11-19 वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृती करण्यासाठी राज्यात अस्मिता योजना राबवण्यास आज राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
अस्मिता योजनेस मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्या प्रसंगी मंत्री पंकजा मुंडे प्रतिक्रीया देताना म्हणाल्या की, स्वच्छता म्हणजे फक्त शौचालय बांधकामापर्यंत मर्यादित न राहता जिल्हा परिषद शाळेतील मुलींना सॅनिटरी नॅपकीन माफक दरात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आजपर्यंत सॅनिटरी नॅपकीन महाग असल्यामुळे,अंधश्रध्देमुळे वापराचे प्रमाण अंदाजे 17 टक्के एवढे कमी होते. आता 5 रुपयात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हे नॅपकीन आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्यामुळे ग्रामीण भागातील महिला व मुली याचा वापर करण्याच्या प्रमाणात वाढ होईल. यामुळे स्वच्छतेबरोबरच आरोग्याच्या समस्या सुटण्यास मदत होणार आहे. यामुळे मुलींची शाळेतील उपस्थिती वाढणार आहे. शाळा सोडणाऱ्या मुलींची संख्या कमी होणार आहे. अस्मिता हे ब्रॅण्ड सॅनिटरी नॅपकीनच्या पॅकेटवर छापले जाणार असून याची नक्कल कोणी करणार नाही याची दखल घेण्यात येणार आहे. अस्मिता ब्रॅण्डच्या अनेक वस्तु शासन बनवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अस्मिता योजनेच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी 1 कोटी रुपये वार्षिक खर्चाकरीता मान्यता देण्यात आली असल्याचे सांगून मंत्री मुंडे म्हणाल्या की, राज्यातील महिला स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकीनची विक्री केल्याने शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल तसेच त्यांच्याद्वारे अस्मिता योजनेची प्रचार प्रसिध्दी करण्यात येणार असल्याने ग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकीनचा वापर अधिक प्रमाणात होऊन महिला स्वयंसहाय्यता समुहांना रोजगार उपलब्ध होवून सक्षम होण्यास मदत होणार आहे.
ग्रामीण भागातील महिला व मुलींच्या प्रजनन स्वास्थ्य व आरोग्याबाबत झालेल्या सर्वेक्षणाच्या आधारे मासिक पाळीच्या काळात योग्य ती काळजी न घेतल्याने महिलां व मुलींमध्ये प्रजननाशी निगडीत अनेक समस्या निर्माण झाल्याचे निदर्शनास आल्याने महिला व मुलींमध्ये वैयक्तीक स्वच्छता व आरोग्याची काळजी घ्यावी याबाबत प्रबोधन करणे आवश्यक होते.
11-19 वयोगटातील किशोरवयीन मुली वयात आल्यानंतर शाळेमध्ये सर्वसाधारणपणे वर्षातील 50 ते 60 दिवस मासिक पाळीच्या काळात अनुपस्थित राहण्याचे वाढल्याचे दिसून आल्याने त्यांना वैयक्तीक स्वच्छता व आरोग्याची काळजी घेण्याबाबत सातत्याने काम करण्याची आवश्यकता होती यामुळे ही योजना महिला व मुलींसाठी लाभदायक ठरणार आहे.
अस्मिता योजनेंतर्गत उमेद पुरस्कृत स्वयंसहाय्यता समुहांची सॅनिटरी नॅपकिन्सची मागणी नोंदविण्यासाठी व पुरवठा करण्यासाठी विशिष्ट ॲप तयार करण्यात येईल. तसेच या ॲपद्वारे योजनेतील सहभागासाठी गावातील स्वयंसहाय्यता समुहाची निवड करुन त्यामार्फत वेळोवेळी त्या गावातील महिलांना एकत्रित मागणीं या ॲपवर करता येणार आहे. पुरवठादारांकडे मागणी केल्याप्रमाणे सॅनिटरी नॅपकिन्स तालुका स्तरावरील वितरकांकडे उपलब्ध करुन देण्यात येतील.
Add new comment