धर्माबाबांवर अत्यंसंस्कार होत नाही तोच बीडमधील आणखी एका धर्माचा व्यवस्थेने घेतला बळी
बीड, (प्रतिनिधी):- मंत्रालयात विष प्राशन केलेले धर्मा पाटील यांच्या पार्थिवावर आज सकाळी १० वाजता विखरण (जि.धुळे) येथे शोकाकूल आणि तणावाच्या वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. धर्मा पाटील यांची आत्महत्या ही सरकारने केलेली हत्या असल्याचा आरोप विरोधांकडून होत असुन सर्वसामान्यांतूनही याविषयी संताप व्यक्त होत आहे. दरम्यान धुळ्याच्या धर्माबाबा यांच्यावर अत्यंसंस्कार होत नाही तोच बीडमधील आणखी एका ‘धर्मा’चा व्यवस्थेने बळी घेतला आहे. सावकाराने हडपलेली जमीन परत कशी मिळवायची?, नापिकीमुळे कर्ज कसे फेडायचे या विवंचणेतून खालापुरी (ता.शिरुर) येथील नारायण लोंढे यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी मयताच्या पत्नीने सावकाराने जमिन हडपल्याची तक्रार केली आहे
शिरुर कासार तालुक्यातील खालापुरी येथील नारायण नानााभाऊ लोंढे (४०) या शेतकर्याने शेतातच काल सायंकाळी विष प्राशन केले. शिरुर येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात आणले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या संदर्भात मयत नारायण लोंढे यांच्या पत्नी सरस्वती लोंढे म्हणाल्या, मुलीच्या लग्नासाठी एका सावकाराकडून ६० हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यासाठी एक एक्कर जमीन गहाण ठेवली होती. व्याजाची परतफेड सुरु असतांनाच सावकाराने जमीन हडपल्याने आणि ते कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेतून पतीने आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले. आज दुपारी उशिरापर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन झाले नव्हते. संबंधित सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करा अशी मागणी नातेवाईक करत होते. मात्र सावकाराच्या काही नातेवाईकांकडून मध्यस्थी करत तोडगा काढण्याचे प्रयत्न उशिरापर्यंत सुरु होते. दरम्यान धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांच्या आत्महत्येने खळबळ उडालेली असतांनाच बीडमधील आणखी एका शेतकर्याने आत्महत्या केल्याने येथील व्यवस्थेचे वाभाडे निघल्याचे स्पष्ट होत आहे. सावकारकी मोडीत काढल्याचा आव आणला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र अशाच सावकारामुळे शेतकरी आपले जिवन संपवत असल्याचे या घटनेवरुन दिसुन येते
Add new comment