मुंदडांच्या उपोषणाने सत्ताधाऱ्यांची होते आहे अडचण
अंबाजोगाई (प्रतिनिदी) - डॉ.विमलताई मुंदडा विचार मंचने जनतेच्या विविध प्रश्नांची सोडवणूक व्हावी म्हणून अनेकवेळा लिखीत स्वरुपात मागणी करुनही मान्य होत नसल्याने शेवटचा उपाय म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा व त्यांचे सहकारी यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणास सुरुवात केली असून आज चौथा दिवस आहे, अद्याप प्रशासकीय पातळीवर कुठल्याही हालचाली दिसत नाहीत. प्रशासनाची अशीच अडेलतट्टू भूमिका राहिली तर उपोषणाच्या व्यतिरीक्त इतरही आंदोलनाचे मार्ग अवलंबण्याची प्रक्रिया सुरु झाली असून यापेक्षाही तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विचार मंचच्या कार्यकर्त्यांनी बोलताना व्यक्त केला.
अलिकडे सार्वजनिक प्रश्नावर निदर्शने, मोर्चे, घेराव अशा प्रकारे आंदोलने क्वचित होताना दिसत आहेत. बीड जिल्ह्याचा विचार केला तर विविध प्रश्नांवर आंदोलन, मोर्चे, उपोषणे करण्याची परंपरा कायम राहीली आहे. अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचे आंदोलन असो की, इतर शहरातील विविध राजकीय प्रश्नाला घेऊन केलेल्या आंदोलनाला पक्षविरहीत सर्वच जण सामिल होतात, मुंदडा यांनी ज्या प्रश्नांसाठी कार्यकर्त्यांना घेऊन उपोषणाची सुरुवात केली, ते प्रश्न श्रीपतरायवाडी गावच्या शिवारातील 60 कोटी रुपये निधी खर्च करुन बांधण्यात आलेल्या इमारतीत प्रस्तावित रुग्णालय सुरु करावे असो की, ए.आर.टी.सेंटरसाठी नविन इमारतीला निधी मिळावा, महाबीजचे कार्यालय शहरात आणावे, महावितरणशी संबंधित डी.पी., ट्रान्सफार्मर दुरुस्तीला लागणारे ऑईल, किटकॅट, तसेच इतर साहित्य मिळावे, सबस्टेशन सुरु करावीत, रुग्णांना मोफत औषध उपचार मिळावा या सर्व मागण्या सर्वसामान्य जनतेच्या हिताच्याच आहेत. जिल्हा प्रशासनाने या उपोषणाकडे ज्या गंभीरतेने पहावयास पाहिजे तसे न पाहता बघ्याची भूमिका घेतल्यामुळे उपोषण किती दिवस चालेल याचा अंदाज कोणालाच येईना झाला आहे.
उपोषणकर्ते नंदकिशोर मुंदडा यांची आजपावेतो राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात महत्वाची भूमिका राहिली आहे. अंबाजोगाईला आलेल्या शासकीय योजनांमध्ये स्व.डॉ.विमलताईंचा सिंहाचा वाटा आहे. असे असतानाही राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुुंडे असोत की माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जर या भागातील जनतेचा प्रश्न म्हणून याकडे पाहून राज्यसरकारकडे याचा जाब विचारला तर यापैकी बरेच प्रश्न मार्गी लागू शकतात, याचे श्रेय अप्रत्यक्षरित्या मुंदडांना मिळाले तरी राष्ट्रवादीलाच मिळणार आहेत. मुंदडांचे राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांशी मतभेद असू शकतात नेतृत्वाशी नाहीत हे बीडला खा.सुप्रिया सुळे यांनी अक्षय मुंदडा यांना थांबवून आस्थेवाईकपणे चौकशी करणे हे त्याचाच द्योतक मानले जात आहे. राज्यात भाजप सत्ताधारी पक्ष आहे, जिल्ह्याच्या पालकमंत्री तीन दिवस मतदार संघात होत्या. केज मतदार संघ शेजारी आहे, या भागातील प्रश्नासाठी आमरण उपोषण होत आहे ही माहिती असूनही साधी चौकशी केली नाही. जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी या प्रश्नांसंदर्भात प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलल्या तरी बरेच प्रश्न मार्गी लागू शकतात आवश्यकता आहे की मानसिकतेची.
Add new comment