राज्यात अध्यात्मिक श्रीमंतीचा जिल्हा म्हणून बीडची ओळख - आ.जयदत्त क्षीरसागर
बीड दि.(प्रतिनिधी)ः- वारकरी सांप्रदाय नामस्मरणाच्या माध्यमातून देवाचे महत्व आणि महात्म्य टिकवून ठेवत आहे. बीड जिल्हा हा वारकरी सांप्रदायामुळे राज्यात अध्यात्मिक श्रीमंतीचा जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला असल्याचे प्रतिपादन लोकनेते आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
पाटोदा तालुक्यातील संत मिराबाई संस्थान महासांगवी येथे आयोजीत आई साहेब पुण्यतिथी सोहळा सप्ताहाच्या सांगता समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खा.प्रितम मुंडे, ह.भ.प.राधाताई सानप, विजय गोल्हार, सुधाकर मिसाळ, सुभाष मिसाळ, प्रा.आघाव आदिंसह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना आ.जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, परमेश्वर प्राप्तीसाठीचा सोपा आणि सरळ मार्ग वारकरी सांप्रदायाने नामस्मरणाच्या माध्यमातून निर्माण केला आहे. प्रभूच्या नामस्मरणात प्रचंड ताकत आणि शक्ती असते. जिथे दगड तरतात तिथे माणसाची मने जुळवण्यासाठी वारकरी सांप्रदाय नामस्मरणाच्या माध्यमातून कोठेही कमी पडत नाही. भक्ताच्या भक्तीसाठी देवाचे महत्व आणि महात्म्य टिकून असते. बीड जिल्ह्यात वारकरी सांप्रदायाचे कार्य मोठ्या प्रमाणात आहे. जिल्हाभरात वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबते असतात त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण चांगले राहते. वारकरी सांप्रदायामुळे राज्यात अध्यात्मिक श्रीमंतीचा जिल्हा म्हणून बीडचा नावलौकिक आहे हे विशेष. त्याग आणि वैराग्य याचा वारसा वारकरी सांप्रदाय सांभाळत आहे. जिथे विज्ञानाला शक्य होत नाही तिथे वारकरी सांप्रदाय करून दाखवतो. चंचल मनाला स्थिर करण्याचे काम वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून होत आहे. माणसाच्या मनातील निर्माण झालेल्या जळमटाचे शुध्दीकरण करण्याचे काम वारकरी सांप्रदाय करतो आहे. यावेळी महासांगवीसह पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Add new comment