लाइव न्यूज़
महामंडळावरील नियुक्त्यांना ग्रीन सिग्नल; बीड जिल्ह्यातून लॉबींग!;भाजपकडून आडसकर, पोकळे यांच्या नावाची चर्चा तर सेनेकडूनही चाचपणी; शिवसंग्रामलाही वेध
Beed Citizen | Updated: January 29, 2018 - 3:14pm
मुंबई : राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर यापूर्वीच्या विविध महामंडळावरील नियुक्त्या रद्द करण्यात आल्या असता, या निर्णयाला महामंडळांवरील पदाधिकार्यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे महामंडळाच्या नियुक्त्या होण्यास विलंब झाला होता. मात्र आता महामंडळावरील नियुक्त्यांना ग्रीन सिंग्नल मिळाल्याने पदाधिकारी आणि आमदारांनी महत्वाच्या महामंडळासाठी लॉबींगला सुरूवात केली आहे. दरम्यान महामंडळासाठी बीड जिल्ह्यातील पदाधिकार्यांनीही फिल्डींग लावली आहे. भाजपकडून रमेश आडसकर आणि रमेश पोकळे यांच्या नावाची चर्चा असुन शिवसेनेकडून अनेकांची नावे पुढे येवू लागली आहेत. त्यातच माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांची नाराजी दुर करण्याच्या दृष्टीने पक्षाकडून प्रयत्न सुरू असल्याचे समजते. शिवसंग्रामलाही महामंडळाचे वेध लागले असून पक्षांतर्गत नावांची चाचपणी सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यातील युती सरकारचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला असतानाही महामंडळांवरील नियुक्त्या न झाल्याने भाजपसह, शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज आहेत. विविध मुद्द्यावरून सध्या सरकार विरोधात वातावरण तयार झाल्याने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर रखडलेल्या विविध महामंडळांच्या आणि सरकारी समित्यांच्या नियुक्त्या फेब्रुवारी महिन्यात केल्या जाणार असल्याचे समजते. राज्यात भाजप आणि शिवसेनेचे सरकार येवून तीन वर्षाचा कालावधी उलटूनही विविध महामंडळे, समित्यांवर नियुक्त्या न झाल्याने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी एक वर्ष, तर विधानसभा निवडणुकीसाठी दीड वर्षांचा कालावधी बाकी आहे. सध्या विरोधी पक्षांनी विविध मुद्दे लावून धरल्याने सरकार विरोधात वातावरण निर्मिती झाली आहे. अशातच सर्वसामान्य कार्यकर्ता नाराज झाल्यास याची मोठी किंमत मोजायला लागू शकते. त्यामुळेच या महामंडळावरील आणि समित्यावरील नियुक्त्या फेब्रुवारी महिन्यात केल्या जाणार आहेत. पुढील महिन्यात सुरू होणार्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महामंडळावरील नियुक्त्या करून आमदार व पदाधिकार्यांना खूष केले जाणार आहे. दरम्यान बीड जिल्ह्यातूनही महामंडळासाठी फिल्डींग लावण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्हा भाजपाच्या कामगिरीत अग्रेस्थानी असलेले रमेश आडसकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांचीही चर्चा होवू लागली आहे. शिवसेनेकडून अनेकांची नावे पुढे येवू लागली असुन नवीन नियुक्त्यांवरून नाराज असलेले माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांची नाराजी दुर करण्याचे प्रयत्न सुरू असून महामंडळाच्या यादीत त्यांचा समावेश करून जिल्ह्यातील शिवसेनेला बळकटी देण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून होण्याचे संकेत आहेत.
Add new comment