आयपीएल लिलाव: १६९ खेळाडू, खर्च ४३२ कोटी

नवी दिल्ली: आयपीएल लिलावाचा दुसरा दिवसही खास ठरला. भारतीय गोलंदाज जयदेव उनाडकट याला राजस्थान रॉयल्सनं तब्बल साडेअकरा कोटी रुपयांना खरेदी केलं. तो आयपीएलच्या यंदाच्या पर्वातील सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला. त्यानं के. एल. राहुल आणि मनीष पांडे यांनाही मागं टाकलं.
यावर्षी आयपीएलमध्ये एकूण १६९ खेळाडूंचा लिलाव झाला. त्यावर संघांनी ४३१ कोटी ७० लाख रुपये खर्च केले. बेन स्टोक्स सलग दुसऱ्या वर्षी आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्यालाही राजस्थान रॉयल्सनं साडेबारा कोटी रुपये मोजून खरेदी केलं. अफगाणिस्तानच्या रशिद खानला सनरायझर्स हैदराबादनं आरटीएमचा वापर करून नऊ कोटी रुपये देऊन संघात घेतलं. चेन्नई सुपर किंग्जनं २५ खेळाडू खरेदी केले. त्यांच्याकडे जवळपास साडेसहा कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत. याशिवाय दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि मुंबई इंडियन्सनंही प्रत्येकी २५ खेळाडू खरेदी केले.
कोलकाता नाइट रायडर्सनं फक्त १९ खेळाडूंना संघात स्थान दिलं. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूनं २४ खेळाडू विकत घेतले. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या जलदगती गोलंदाज अँड्र्यू टायला किंग्ज इलेव्हन पंजाबनं ७.२ कोटी रुपयांना खरेदी केलं. मात्र, वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला अखेरच्या क्षणी किंग्ज इलेव्हन पंजाबनं फक्त २ कोटी रुपये मोजून खरेदी केलं.
Add new comment