चोर्याच चोर्या चोहीकडे..गेले पोलिस कोणीकडे..?
बीड (प्रतिनिधी) शहरातील चोर्यांची मालिका सुरूच असुन दोन दिवसापूर्वीच झमझम कॉलनी आणि चाणक्य पुरी भागात झालेल्या चोर्यानंतर काल भरदुपारी एका वरिष्ठ लिपीकाचे घर फोडून पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. मध्यवस्तीत होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. चोर्याच चोर्या चोहीकडे...आणि गेले पोलिस कोणीकडे..? असेच म्हणण्याची वेळ लोकांवर आली आहे.
बीड शहरातील शाहु औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वरिष्ठ लिपीक सुभाष दगडूबा आस्वले यांच्या घरी काल दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरातील चाळीस हजार सातशे रूपयांची रोकड आणि दहा तोळे सोने असा एकूण २ लाख ८५ हजार सातशे रूपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अस्वले यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून गुन्हा नोंदवूनही तपासाला गती मिळत नसल्याने नागरीकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
बीड शहर हद्दीतील चोरीच्या घटनेतील तपासही थंडच!
बीड शहर हद्दीतील झमझम कॉलनी भागामध्ये बाजार समितीचे कर्मचारी शेख कलीम शेख सलीम यांच्या घरी चोरी होवून तीन दिवस उलटले. गजबजलेल्या वस्तीत आणि चौथ्या मजल्यावरील खोलीत चोरी होवूनही पोलिसांना अद्यापपर्यंत तपासातील काहीच धागेदोरे हाती लागलेले नाहीत. त्याच रात्री एका अन्य व्यक्तीला लुटण्यात आले होते. मात्र त्याचाही तपास लावण्यात शहर पोलिसांना यश आलेले नाही. चोरी होवून तीन दिवस झाले तरी घटनेचा तपास थंडच असल्याने नागरीकांमधून पोलिस प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त होवू लागली आहे.
Add new comment