परळीत नऊ महिन्याच्या बालिकेचा संशयास्पद मृत्यू

परळी (प्रतिनिधी) एका नऊ महिन्याच्या बालिकेचा आज सकाळी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना वडसावित्री नगर भागात घडली. सदरील बालिकेचा मृत्यू कशामुळे झाला? याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी काल तिला डोस पाजल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दुपारी उशिरा तिचा मृतदेह अंबाजोगाई येथील रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. दरम्यान आरोग्य  प्रशासनाने मात्र मुलीचा मृत्यू डोस पाजल्यामुळे झाला नसल्याचे स्पष्ट केल्याचे समजते.
परळी शहरातील वडसावित्रीनगर भागात आज सकाळी आरती नंदु जाधव (नऊ महिने) या मुलीचा अचानक मृत्यू झाला आहे. उपजिल्हा रूग्णालया समोर आलेल्या नातेवाईकांनी मुलीचा मृत्यू हा डोस पाजल्यामुळे झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार काल दुपारी तिला अंगणवाडी कर्मचार्‍यांनी नऊ महिन्याचा डोस पाजला होता. त्यामुळेच हा प्रकार झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. दुपारी उशिरा तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील रूग्णालयात आणण्यात आला होता. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्यानंतर पुढील कार्यवाही करणार असल्याचे बीट अंमलदार चव्हाण यांनी सांगितले आहे. दरम्यान आरोग्य प्रशासनाने मात्र डोस पाजल्यामुळे मृत्यू झाला नसल्याचे स्पष्ट केले असून डोस पाजल्यानंतर काही तासात रिऍक्शन येवू शकते, पंधरा ते सोळा तासानंतर त्याची रिऍक्शन येवू शकत नाही त्यामुळे तिचा मृत्यू डोस पाजल्यामुळे झाला नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच बालिकेच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.