नांदेडमध्ये बिटकॉईन कंपनीचा अनेकांना कोट्यवधींचा गंडा, गुन्हा दाखल
नांदेड (वृत्तसेवा) गेन बिटकॉईन कंपनीने नांदेडमधील अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. आता या प्रकरणात नांदेडमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये बिटकॉईनचं आकर्षण दिसून येत आहे. मात्र आता यामध्ये फसवणूक होत असल्याचंही समोर आलं आहे.
जगभरासह भारतातही चलनाला पर्याय ठरु पाहणार्या बिटकॉईन या डिजिटल चलनाचं जाळं सगळीकडे पसरलं आहे. बिटकॉईनच्या फसवणुकीबाबत आता पोलिसांत गुन्हे दाखल होऊ लागल्याने बिटकॉईनची व्याप्ती उघड होऊ लागली आहे. नांदेड शहरातही या अदृष्य डिजिटल चलनातील फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. बिटकॉईन सॉफ्टवेअरची गुंतवणूक केल्यास प्रति महिना १० टक्के व्याजदर मिळण्याचं अमिष दाखवून गेन बिटकॉईन या कंपनीने अनेकांना गंडा घातला. नांदेडमधील अनेकांनी या गेन बिटकॉईन कंपनीशी करार करुन आपले बिटकॉईन सॉफ्टवेअर दिले. सुरुवातीला २ ते ३ महिने अनेकांना १० टक्के रक्कम प्राप्त झाली. मात्र त्यानंतर गेन बिटकॉईनकडून गुंतवणूकदारांची फसवणूक सुरु झाली. विमानतळ पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी कलम ४२० आणि ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. नांदेडमधील गेन बिटकॉईनचे एजंट बालाजी पांचाळ, राजू मोतेवार, अमोल थोंबाळे आणि मुख्य आरोपी गेन बिटकॉईनचा निर्माता अमित भारद्वाज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल थोंबाळे याला अटक करण्यात आली आहे. गेन बिटकॉईनचा निर्माता अमित भारद्वाज सध्या दुबईमध्ये आहे. संपूर्ण भारतात त्याच्या गेन बिटकॉईनचं जाळं आहे. गेन बिटकॉईनच्या माध्यमातून भारद्वाजने अब्जावधी रुपये कमावल्याची माहिती आहे. दुबईत भारद्वाज आलिशान लाईफ जगतो. भारतात अनेकांना अब्जावधी रुपयांचा गंडा घालणार्या अमित भारद्वाजपर्यंत पोलिसांचे हात कसे पोहोचणार, हा खरा प्रश्न आहे.
Add new comment