Add new comment
धोनीचा नवा विश्वविक्रम! संगकाराला टाकलं मागे

जोहान्सबर्ग : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं भारताला दोन वर्ल्ड कप जिंकवून दिले. पण मागच्या काही काळापासून धोनी माजी खेळाडूंच्या निशाण्यावर आहे. धोनीनं टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी अशी मागणी व्ही.व्ही.एस.लक्ष्मण आणि अजित आगरकर यांनी केली होती. टीका होत असली तरी विकेट मागून धोनीचे सल्ले भारताच्या विजयात महत्त्वाचे ठरत आहेत. धोनीच्या या सल्ल्यांचं कौतुक होत असतानाच तो अनेक रेकॉर्डही मोडत आहे. जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मॅचमध्येही धोनीनं नवा विक्रम केला आहे.दक्षिण आफ्रिकेचा बॅट्समन रेजा हेन्ड्रिक्सचा कॅच धोनीनं घेतला आणि टी-20मध्ये सर्वाधिक कॅच पकडण्याचा रेकॉर्ड धोनीच्या नावावर झाला आहे.
धोनीनं त्याच्या २७५व्या टी-20मध्ये भुवनेश्वर कुमारच्या बॉलिंगवर हेन्ड्रिक्सला त्याची १३४वी शिकार बनवली. याआधी श्रीलंकेच्या कुमार संगकारानं २५४ मॅचमध्ये १३३ कॅच घेतले होते. या यादीमध्ये दिनेश कार्तिक तिसऱ्या क्रमांकावर आहे. कार्तिकनं टी-20 क्रिकेटमध्ये १२३ कॅच घेतले आहेत.क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक कॅच पकडणाऱ्यांच्या यादीमध्ये धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीच्या पुढे आता फक्त मार्क बाऊचर आणि ऍडम गिलख्रिस्ट हेच विकेट कीपर आहेत.