Add new comment

केंद्र सरकारने संघाच्या स्वयंसेवकांना काठी घेऊन सीमेवर पाठवावे-शरद पवार; मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा शरद पवारांकडून समाचार

पंढरपूर (वृत्तसेवा) देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सैनिक आपल्या प्राणपणाची बाजी लावतात. पण त्यांच्या ऐवजी आता केंद्र सरकारने संघाच्या स्वयंसेवकांना हाफ पँट-शर्ट घालून आणि काठी घेऊन देशाच्या सीमेवर दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी पाठवावे म्हणजे भागवतांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे ते देशाला समजेल अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. पंढरपूरमध्ये बोलत असताना त्यांनी मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर आपली खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
देशासाठी सर्वस्व त्यागणार्‍या सेनेऐवजी सीमेवर तोंड द्यायला ठडड चे स्वयंसेवक जाणार, तेही ३ दिवसांत. केंद्र सरकारने काठ्या घेऊन, हाफ पँट घालून आतंकवाद्यांचा सामना करत सीमेचं रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवावी, म्हणजे भागवतसाहेबांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे हे देशाला कळेल.
काही दिवसांपूर्वीच सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाचे स्वयंसेवक तीन दिवसात प्रशिक्षित होतात. सीमेवर लढणार्‍या जवानांना प्रशिक्षित करण्यासाठी सहा महिने लागतात. मात्र संघाचे स्वयंसेवक तीन दिवसात प्रशिक्षित होतात. वेळ पडली तर ते सीमेवरही जायला तयार आहेत असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर मोहन भागवत यांच्यावर टीकेची झोड उठली होती. इतकेच नाही तर त्यांनी देशाची माफी मागावी अशीही मागणी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने केली होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘भागो भागवत आया’ असा संदेश लिहित एक व्यंगचित्र काढूनही त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारने सैनिकांऐवजी संघाच्या स्वयंसेवकांनाच सीमेवर पाठवावे असा उपरोधिक सल्ला दिला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या प्रशिक्षण शिबीरा दरम्यान हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. ज्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद देशभरात उमटले होते. तर भागवतांनी संघाच्या स्वयंसेवकांची तुलना ही सैनिकांशी नाही देशातल्या जनतेशी केली होती असे स्पष्टीकरण संघाने दिले होते. असे असले तरीही भागवत यांच्यावर टीका झालीच. शरद पवारांनीही त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. याचवेळी झालेल्या भाषणात शरद पवार यांनी नीरव मोदीचा घोटाळा हा मोदी सरकारला ठाऊक होता असेही वक्तव्य केले.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.