बीड पं.स. तील 14 कोटींचा घोटाळा ; अखेर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

बीड दि.30 ( सिटीझन ) येथील पंचायत समितीत रोजगार हमी योजनेच्या कामात 14 कोटी 80 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे सिद्ध झाला होता. याप्रकरणात तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सेवा समाप्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिले होते. मात्र महिना उलटूनही गुन्हे दाखल होत नव्हते.अखेर आज दि.30 मे रोजी त्या तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांवर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान हा मुद्दा शिवसंग्रामचे आ.विनायक मेटे यांनी उचलून धरला होता. पुराव्यासह तक्रारी केल्या होत्या. सातत्याने यासंदर्भात पाठपुरावा केला. गुन्हा दाखल होत नसल्याने आठवड्यापूर्वीच आ.मेटे यांनी सीईओंना पत्र लिहून याबाबत विचारणा केली होती. त्यामुळे आज कारवाई झाली. मात्र घोटाळ्यातील मोठे मासे बाजूला राहिले आणि कंत्राटी कर्मचाऱ्यावरच कारवाई झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. या करवाईने बीड पंचायत समितीतील सत्ताधाऱ्यांना मात्र मोठा दणका बसला आहे. 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात बोगस वर्क कोड तयार करुन कामाचे प्रत्यक्ष ठिकाण (Geo Tag) निश्चित करणे, Approved करणे, रु.14 कोटी 80 लाखाची देयके ऑनलाईन करणे या नियमबाहय कामा बाबत अहवाल सादर करण्यात आला. त्याआधारे या प्रकरणातील जबाबदार कंत्राटी कर्मचारी राठोड बंडु  ऑपरेटर (CDEO), प्रशांत आबुज एस. तांत्रिक सहाय्यक (TA) आणि शाम पंडीत, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (APO) यांच्या सेवा समाप्त करण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच अनियमिततेस जबाबदार कर्मचाऱ्या विरुध्द प्रशासकीय कारवाई करण्यात आलेली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मंजुर कामाच्या मुळ संचिका, प्रशासकीय, तांत्रिक मान्यता, कार्यारंभ आदेश, कामाची अंदाजपत्रक नसताना त्याची तपासणी न करताच नरेगा संकेत स्थळावर कामाचे बोगस संकेतांक क्रमांक (Work Code) तयार करणे, दिलेल्या जि.प.गटाच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन (Geo Tag) कामाचे प्रत्यक्ष ठिकाण निश्चित करणे त्यानंतर Approved करुन दि.
14 मार्च 2020 ते दि. 18 मार्च 2020 या कालावधीचे बोगस हजेरीपत्रक निर्गमित करणे (जे संकेत स्थळावर शुन्य करण्यात आले आहेत, त्याचे Payment झालेले नाही) आणि कोणतेही अभिलेखे उपलब्ध नसताना रु. 14.80 कोटीची कुशल देयके ऑनलाईन करणे या बाबी वरुन त्यांची सचोटी ही संशयास्पद असल्यामुळे तीनही कंत्राटी कर्मचाऱ्या विरुध्द नरेगा संकेत स्थळावर (www.nrega.nic.in) नियमबाहय, अनियमित व चुकीचे कामे केली. म्हणुन त्यांना 14.80 रु.कोटी चे ऑनलाईन करुन शासनाची फसवणुक करुन अपहार करण्याच्या उददेशाने प्रयत्न केल्याप्रकरणी बिडीओ रवींद्र तुरुकमारे यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तिन्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कलम 409, 420, 511, 34, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 65 ( 66 ड ) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.