पुण्यातील बेपत्ता तरुणाच्या खून प्रकरणाचा उलगडा ; सौताडा घाटात सापडले अवशेष

जामखेड :  पुणे परिसरातून मागिल सतरा दिवसांपासुन बेपत्ता असलेल्या तेजस भिसे या तरूणाची  आर्थिक देवाणघेवाणीतून मित्रानेच हत्या केल्याची बाब उडकीस आणण्यात वाकड पोलिसांना यश आले. या प्रकरणातील मुख्य आरोपी जामखेड तालुक्यातील रहिवासी असुन त्याने तेजसची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह जामखेड जवळील सौताडा घाटातील दगडाखाली टाकून दिला होता ही बाब पोलिसा तपासात उघडकीस आली आहे. मृतदेहाचे अवशेष सौताडा घाटात सापडल्यानंतर दोघा आरोपींविरोधात पुणे येथील वाकड पोलीस स्टेशनला खुनाचे गुन्हे  दाखल केले जाणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. 

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी दि २० एप्रिल रोजी मयत तेजस सुनिल भिसे, वय २८ रा.रहाटणी छत्रपती चौक, पुणे याने  मित्र दत्तात्रय नवनाथ बिरंगळ वय ३० (हल्ली रा. पुणे) मुळ रा सोनेगाव, ता.जामखेड, याच्या सोबत धुळे - अमरावतीला कार नं एम एच १२ एन एल ००९८ ने चाललो आहे असा मॅसेेज आपला मावसभाऊ निलेश मोरे यांच्या फोनवर केला होता. मात्र मयत तेजस संध्याकाळी घरी न परतल्याने २१ एप्रिल रोजी तेजसचा भाऊ प्रविण भीसे याने पुणे येथील वाकड पोलीस स्टेशनला तेजस हरवल्याची तक्रार दाखल केली होती. 

दरम्यान तेजसचा भाऊ प्रविण भिसे याने  दत्ता नवनाथ बिरंगळ व समाधान बिभिषण भोगल वय २४ (हल्ली रा जाधववाडी चिखली पुणे) मुळ रा बोरगाव ता. करमाळा या दोघांविरोधात ३० एप्रिल रोजी वाकड पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत बेपत्ता तेजसचा शोध घेण्यासाठी गुप्त माहिती काढण्यास सुरवात केली होती.तेजसच्या बेपत्ता होण्यामागे त्याचे मित्र दत्ता बिरंगळ व समाधान भोगल या दोघांचा सहभाग असु शकतो तसे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागताच वाकड पोलिसांनी बेपत्ता तेजसच्या अपहरणप्रकरणी ५ मे रोजी बिरंगळ व भोगल या दोघा आरोपींच्या मुसक्या आवळलत व अटक केली होती.दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

पोलिस कोठडीत आरोपींना वाकड पोलिसांनी आपला पोलिस खाक्या दाखवताच दोघा आरोपींनी तेजसच्या खुनाची कबूली दिली. मयत तेजस भिसे हा जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता. त्याने आपला मित्र दत्ता बिरंगळ यास चिखली येथे फ्लॅट घेण्यासाठी पैसे दिले होते. मात्र मयत तेजस भिसे यास बँकेचे हप्ते भरण्यासाठी पैशाची गरज आसल्याने तो आरोपीकडे उसने दिलेल्या पैशांची सतत मागणी करत होता.तेंव्हा आरोपींनी मयत तेजसला चल तुला जामखेड येथे पैसे देतो असे म्हणून कारने २० एप्रिल रोजी जामखेडकडे निघाले होते. दरम्यान प्रवास करत असतानाच आरोपी दत्ता बिरंगळ व समाधान भोगल यांनी तेजसचा गाडीतच गळा आवळून खून केला होता.खुन केल्यानंतर आरोपींनी तेजसचा मृतदेह जामखेड जवळील सौताडा घाटातील दगडाखाली टाकला व कपडे खर्डा रोडवरील राजुरी शिवारात लपवले होते. तेजसच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर आरोपी पुण्याला परतले होते.यावेळी आरोपींनी वापरलेली कार काळेवाडी येथे सोडून आरोपी फरार झाले होते. 

दरम्यान पोलिस कोठडीत असलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी आज ७ मे रोजी जामखेड येथील घटनास्थळी आणण्यात आले होते. वाकड पोलिसांनी जामखेड पोलिसांच्या मदतीने मृतदेह लपवलेल्या जागेचा पंचनामा केला. यावेळी पोलिसांना मयत तेजसचे फक्त हाडं मिळून आले. अवशेष वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान पंचनामा करताना जामखेड पोलिस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे, वाकड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हरीष माने, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, वैद्यकीय अधिकारी डॉ युवराज खराडे यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला. 

तेजस भिसेच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वाकड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हरीष माने, हे.कॉ.बाप्पु धुमाळ, बिभिषण कन्हेरकर, विक्रम कुदळे, विजय गंभीरे सह आदींच्या टिमने अहोरात्र तपास करत मारेकर्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले. पुढील तपास वाकड पोलिस करत आहेत. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.