टाकळीअमिया येथील शाळेची पडवी पडल्याने तीन विद्यार्थीनी जखमी

आष्टी (प्रतिनिधी) :-परिपाठानंतर शाळेतील वर्गखोलीबाहेर रांगोळी
काढणा-या मुलींच्या अंगावर पडवीचा खांब सटकल्याने त्यावरील पत्रे कोसळून तीन विद्यार्थिनी जखमी झाल्या.
आष्टी तालुक्यातील टाकळी आमियां येथे आज दि. 3 जानेवारी सकाळी 11 चे सुमारास ही घटना घडली. जखमी विद्यार्थिनींना उपचारार्थ कडा येथे हलविण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या टाकळी आमियां येथील शाळेमध्ये आज निवडणूक विभागातर्फे शाळेतील शिक्षकांसाठी इव्हीएम मशीनच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे सकाळी 10 वाजता परिपाठ आटोपल्यानंतर हे प्रात्यक्षिक घेण्यासाठीची तयारी सुरू होती. तर याच वेळी शाळेत रांगोळीच्या स्पर्धा असल्याने एक वर्गखोली रिकामी करून समोर असलेल्या पत्र्याच्या पडवीमध्ये काही विद्यार्थिनी रांगोळी काढत होत्या. यावेळी अचानक पडवीचे पत्रे उभा करण्यात आलेला खांब सटकून त्यावरील पत्रे खाली कोसळले. काही कळायच्या आत घडलेल्या या घटनेत रांगोळी काढणा-या सविता शिवाजी मिरड (इयत्ता 5 वी, वय 10 वर्षे), गायत्री शिवाजी चौधरी
(इयत्ता 7वी, वय 13 वर्षे), सानिका संदीप चौधरी (इयत्ता 5वी, वय 10 वर्षे) या तीन मुली पत्रे खरचटल्याने जखमी झाल्या. जखमी विद्यार्थिनींना उपचारांसाठी कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाठविण्यात आल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक किशोर कस्तुरे यांनी दिली.दुरुस्तीसाठीच्या पत्राला उत्तरही नाही.दरम्यान, शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक रमेश शेंडगे यांनी शाळेच्या वर्गखोल्यांच्या झालेल्या दुरवस्थेची माहिती 6 महिन्यांपूर्वीच शिक्षण विभागाला कळवून या खोल्यांची तातडीने दुरुस्ती व्हावी अशी मागणी केली होती. मात्र शिक्षण विभागातर्फे याची कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याची माहिती समोर येत आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.