एसटीचा तोटा भरण्यासाठी तिकीट दरवाढ हाच एकमेव पर्याय?

धुळे, (प्रतिनिधी):- सातत्याने वाढणार्‍या डिझेल किमतीचा थेट परिणाम राज्यातील एसटी महामंडळाच्या खर्चावर झाला आहे. दररोज दोन कोटी रुपयांनी तोट्यात असणार्‍या एसटीला डिझेल दरवाढीमुळे आणखी ९७ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. परिणामी येत्या काही दिवसात प्रवाशांना अपरिहार्यपणे एसटीच्या तिकीट दरवाढीला सामोरं जावं लागणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्राची ’लोकवाहिनी’ समजल्या जाणार्‍या एसटीला डिझेल दरवाढीचा झटका सोसवेना झाला आहे. नाईलाजास्तव तिकीट दरवाढ करून वाढता तोटा कमी करण्याची कसरत एसटीला करावी लागणार आहे. एसटीच्या तिकीट दरवाढीला राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी लागते. त्यानुसार एसटी महामंडळ विशेष सूत्रानुसार भाडेवाढीचा प्रस्ताव तयार करते, हा प्रस्ताव एसटीच्या संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर राज्य परिवहन प्राधिकरणाकडे सादर केला जातो.
मुख्यतः डिझेलचे दर, टायरच्या किंमती, गाड्यांच्या चेसीसच्या किंमती  आणि कामगारांच्या महागाई भत्त्यातील वाढ या घटकातील बदलावर एसटीची तिकीट भाडेवाढ अवलंबून असते. गेल्या सात-आठ महिन्यात डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. जुलै २०१७ मध्ये एसटीला मिळणार्‍या डिझेलचा दर ५४.७४ रुपये प्रति लिटर होता, तो एप्रिल २०१८ मध्ये ६३.७८ रुपये प्रति लिटरवर पोहोचला. एसटीला दररोज सरासरी १२ लाख १२ हजार ५०० लिटर डिझेल लागतं. म्हणजेच, जुलै २०१७ च्या तुलनेत एप्रिलमध्ये दररोज एसटीला डिझेलसाठी सुमारे ९७ लाख रुपये अतिरिक्त मोजावे लागत आहेत.
या बरोबरच जीएसटीमुळे टायर आणि गाड्यांच्या चेसीसचे दरही वाढले आहेत. वाढता तोटा लक्षात घेऊन एसटीने गेली दोन वर्षे नवीन गाड्या विकत घेणं बंद केलं आहे. मात्र अत्यावश्यक टायरचा पुरवठा मात्र सुरू आहे. त्यामुळे वाढत्या टायर किंमतीमुळे एसटीच्या तोट्यात भर पडली आहे. कामगारांच्या महागाई भत्त्यात झालेली वाढ लक्षणीय आहे. त्याचा थेट बोजा एसटीच्या कामगारांच्या वेतन खर्चावर पडतो.२०१४ मध्ये १०७ टक्के असलेला महागाई भत्ता एप्रिल २०१८ मध्ये १३६ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तसेच सन २०१६ ते २०२० या वर्षाचा प्रलंबित वेतन वाढीचा करार झाल्यास त्याचाही अतिरिक्त बोजा एसटीवर पडणार आहे. एकंदरीत एसटीच्या कामगारांच्या वेतनावरील खर्चात आणखी वाढ होणार हे निश्चित आहे. त्यामुळे सध्या एकूण खर्चाच्या ४४ टक्के असलेला वेतनखर्च भविष्यात ५० टक्क्यांपेक्षा जास्त होईल. साहजिकच सध्या वार्षिक ५४४ कोटी रुपये तोटा सहन करणार्‍या एसटीला भविष्यात एक हजार कोटी वार्षिक तोटा सहन करावा लागणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एसटीची तिकीट भाडेवाढ अटळ आहे. यापूर्वी ३१ जुलै आणि २२ ऑगस्ट २०१४ ला  दोन टप्प्यात मिळून एसटीची साधारण १३-१५ टक्के भाडेवाढ झाली होती. आता लवकरच प्रवाशांना अंदाजे १० ते १५ टक्के तिकीट दरवाढीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.