शिवसेना कर्नाटक विधानसभेच्या ५० ते ५५ जागा लढवणार

मुंबई, (प्रतिनिधी):- गोवा आणि उत्तर प्रदेश पाठोपाठ शिवसेना कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात घोषणा केली. महाराष्ट्र एकीकरण समितीला शिवसेना पाठिंबा देणार आहे.
कर्नाटकात शिवसेना ५० ते ५५ जागा लढवणार आहे. शिवसेनेने फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्धार व्यक्त केला होता.
सीमा भागात राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणुका लढणार नाही, सीमा भागात इतर पक्षांनीही निवडणुका लढवू नयेत. जोपर्यंत सीमा भागाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत केंद्रशासन करावं, अशी मागणी राऊत यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी सीमा भागात येऊन एकीकरण समितीचा प्रचार करावा, तर ते खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, असं आव्हानही संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं.
मुख्यमंत्र्यांनी सीमा भागात प्रचाराला जाऊ नये. हे नैतिकदृष्ट्या योग्य नाही. राज्यपालाच्या अभिभाषाणात सीमा भागाचा उल्लेख असतो, हे त्यांना शोभणारं नाही, असंही राऊत म्हणाले.
आगामी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढेलच, पण यापुढे सर्वच राज्यात शिवसेना उमेदवार देईल. आम्ही निवडणूक जिंकू किंवा हरु, किती मतं पडतील माहित नाही, पण आम्ही लढू असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
दुसरीकडे, शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपच्या गोटात हालचाली सुरु आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच कथित उंदीर घोटाळ्यावरुन विरोधकांना उत्तर देताना २०१९ मध्ये वाघ-सिंह एकत्रच लढतील, असे संकेत दिले.
 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.