कोपर्डी येथील आरोपींवरील हल्ला प्रकरण गेवराईच्या दोघांसह चौघांना सहा वर्षांची शिक्षा

अहमदनगर, (प्रतिनिधी):-कोपर्डी खटल्याच्या सुनावणीनंतर तीनही आरोपींना जिल्हा न्यायालयातून बाहेर घेऊन जात असताना त्यांच्यावर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने आज सहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आरोपींमध्ये गेवराई तालुक्यातील दोघांचा तर जालना जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. चौघेही शिवबा संघटनेचे कार्यकर्ते आहेत.
अमोल सुखदेव खुणे (वय २५, रुईधानोरा, गेवराई, बीड), बाबुराव वामन वाळेकर (वय ३०, अंकुशनगर, ता. अंबड, जिल्हा जालना), गणेश परमेश्वर खुणे (वय २८, रा. रुईधानोरा), राजेंद्र बाळासाहेब जराड (वय २१ रा. परांडा, अंबड, जिल्हा जालना) अशी दोषींची नावे आहेत. या आरोपींना मंगळवारी न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आज बुधवारी चौघांनाही सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. ‘तुम्ही ठरवून कट रचून आरोपींवर हल्ला केला आहे. हे साक्षीदार, न्यायालयातील आवारात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फुटेजवरून सिद्ध होत असल्याने तुम्हा चौघांना गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून सहा वर्षांची शिक्षा देण्यात येत आहे. असा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला. सरकार पक्षातर्फे ऍड. मंगेश दिवाणे यांनी बाजू मांडली. कोपर्डी खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू असतांना १ एप्रिल २०१७ रोजी नियमित सुनावणीनंतर आरोपी जितेंद्र शिंदे, नितीन भैलूमे, संतोष भवाळ या तीन आरोपींना पोलिस कर्मचारी न्यायालयातील लॉकअपमधून बाहेर काढून सबजेल कारागृहात घेऊन जात असताना न्यायालयाच्या आवारात चौघेजण सत्तूर घेऊन आरोपींच्या दिशेने धावून आले. पोलिस बंदोबस्त जास्त असल्याने पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेतले. या चौघा आरोपींबरोबर झालेल्या झटापटीत पोलिस कर्मचारी रवींद्र भास्कर टकले हे जखमी झाले होते. सहायक फौजदार विक्रम दशरथ भारती यांच्या फिर्यादीवरून चारही जणांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, कट रचणे, सरकारी कामात अडथळा आणणे व आर्म ऍक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर आरोपी दलित असल्याने ऍट्रासिटी कायद्याचे कलमे लावण्यात आली होती.
या चौघा आरोपींविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. फिर्यादी विक्रम भारती, तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने, जखमी पोलिस कर्मचारी रवींद्र टकले, पोलिस उपनिरीक्षक संजय कवडे, सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज देणारे मुकुंद मोरे, डॉक्टर पुष्पा नरवडे अशा सातजणांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकार पक्षाने मांडलेले पुरावे व युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून चौघा आरोपींना मंगळवारी  दोषी ठरविल्यानंतर आज बुधवारी (दि.२८ ) या आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली. आरोपीकडून ऍड. वाजेद शेख (बीडकर), ऍड.गणेश मस्के यांनी बाजू मांडली.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.