पुलात मोटारसायकल कोसळून विद्यार्थी ठार

अंबाजोगाई, (प्रतिनिधी):- लातूर - अंबाजोगाई रोडवरील वाघाळा पाटीजवळ सध्या काम सुरु असलेल्या पुलात मोटारसायकल कोसळून एक महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी रात्री उशिराच्या सुमारास झाला.
याबाबत प्राप्त माहिती अशी कि, नुकतीच अकरावीची परीक्षा देऊन बारावीच्या वर्गात गेलेले पवन मुंजाजी कनले (वय १७, रा. जैन गल्ली, अंबाजोगाई) आणि ऋषिकेश लक्ष्मण गडदे (वय १७, रा. बोधेगाव, ता. अंबाजोगाई) हे दोन महाविद्यालयीन विद्यार्थी रात्री उशीरापर्यंत शहरातील एका अभ्यासिकेत बसून होते आणि रात्री ११.३० वाजताच्या सुमारास ते तिथून निघून गेले असे समजते. त्यानंतर रात्रीतून कधीतरी त्यांची पल्सर मोटारसायकल वाघाळा जवळ सध्या काम सुरु असलेल्या पुलात कोसळली. या अपघातात पवन कनले याचा जागीच मृत्यू झाला तर ऋषिकेश गडदे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रस्त्याच्या खूप खाली दोन्ही युवक पडलेले असल्याने त्यांच्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. पहाटेच्या सुमारास रस्त्याने जाणार्‍या काही जागरूक नागरिकांनी १०८ रुग्णवाहिकेला बोलावून घेऊन जखमी ऋषिकेशला रुग्णालयात हलविले.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.