औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव सक्तीच्या रजेवर, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई, (प्रतिनिधी):-कचराकोंडीवेळी मिटमिटा येथे गोंधळ झाल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती हाताळताना असंवेदनशीलता दाखवत नागरिकांच्या घरावर दगडफेक केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता.
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमध्ये सुरू असलेल्या कचराकोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा विधानसभेत चांगलाच गाजतोय. महिना होत आला तरी हा प्रश्न सुटत नसल्यामुळे विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. औरंगाबादमधील कचराकोंडीवरून विरोधकांनी विधानसभेत गदारोळ घातला. त्यामुळे विधानसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. कचराकोंडीवेळी मिटमिटा येथे गोंधळ झाल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती हाताळताना असंवेदनशीलता दाखवत नागरिकांच्या घरावर दगडफेक केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता. तोच धागा पकडत विरोधकांनी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना निलंबित करण्याची मागणी केली. दरम्यान, आयुक्त यशस्वी यादव यांना आजपासूनच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. तसेच एक महिन्याच्या आत एक समिती नेमण्यात येईल व त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी सभागृहाला दिली.
विधानसभेचे कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी औरंगाबादच्या कचर्‍याप्रश्नी आवाज उठवला. इतके दिवस होऊनही कचरा प्रश्न कसा मिटला नाही, असा जाब त्यांनी विचारला. औरंगाबादचे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनीही याबाबत आपले मत मांडले. दरम्यान, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हेही याप्रश्नी आक्रमक झाले होते. मिटमिटा येथील नागरिकांनी कचरा टाकण्यास विरोध करत कचरा गाडी पेटवली होती. त्यानंतर तेथील परिस्थिती चिघळल्यानंतर पोलिसांनी ती सावरण्यापेक्षा त्यांनीच दगडफेक केल्याचा आरोप करत चौकशी पूर्ण होईपर्यंत पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना निलंबित करण्याची मागणी अजित पवार आणि विखे-पाटील यांनी केली.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.