बारावीच्या परीक्षा व्यवस्थापनात झाले मोठे फेरबदल 

बीड : यंदा बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून, ती २० मार्चपर्यंत चालणार आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अनेक बाबींमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने परीक्षा कक्षातील आसन मर्यादा, प्रश्नपत्रिकांच्या वाटपाचा समावेश आहे. 
या वर्षापासून एका परीक्षा कक्षात अवघे २५ विद्यार्थी बसतील एवढीच असेल. यासाठी जास्तीचे वर्ग असलेली महाविद्यालये, हायस्कूलची परीक्षा केंद्रासाठी निवड करण्यात आली आहे. याशिवाय, बारावीच्या प्रश्नपत्रिकांचे सीलबंद गठ्ठेदेखील थेट वर्गातच विद्यार्थ्यांच्या साक्षीने फोडले जाणार आहेत. बोर्डाने घेतलेल्या या निर्णयामुळे परीक्षेतील गैरप्रकारांना आळा बसेल. कॉपीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात घटण्यास मदत होईल. मागील काही परीक्षांमध्ये दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिका व्हॉटस् अ‍ॅपवर फुटल्याने गोंधळ उडाला होता. याची पुनरावृत्तीही टाळण्यासाठी मंडळाने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते. 

आतापर्यंत कस्टोडियनमार्फत प्रश्नपत्रिकांचे सीलबंद गठ्ठे केंद्र संचालकांच्या ताब्यात दिले जात होते. केंद्र संचालकांच्या आदेशानुसार परीक्षा केंद्रात एका हॉलमध्ये ते गठ्ठे फोडले जायचे. त्याठिकाणी परीक्षेच्या वर्गावर नेमलेल्या पर्यवेक्षकांना प्रश्नपत्रिकांचे वाटप केले जायचे. यंदापासून केंद्र संचालक हे प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकिटे पर्यवेक्षकांना देतील. परीक्षेपूर्वी काही मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिकांचे ते सीलबंद पाकीट दोन परीक्षार्थींच्या स्वाक्षरीने फोडले जाईल. यामुळे गैरप्रकार करण्यास वाव मिळणार नाही, अशी शिक्षण मंडळाची धारणा आहे.

बारावीसाठी दीड लाख विद्यार्थी
या संदर्भात विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव पुन्ने म्हणाल्या की, औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळांतर्गत यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १ लाख ६४ हजार ८७८ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे. २५ विद्यार्थी संख्येच्या मर्यादेमुळे जास्तीच्या वर्गखोल्या लागतील, याचीही दक्षता घेण्यात आली आहे. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.