महाराष्ट्रात सध्या नांदेड प्रदेश काँग्रेस, उद्धव ठाकरे म्हण्जे रंग दिलेला वाघ -राणे

औरंगाबाद(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात सध्या फक्त नांदेड प्रदेश काँग्रेस आहे, तिकडे उद्धव ठाकरे हे रंग दिलेला वाघ झालेत, तर ज्यांच्यावर आयुष्यभर खार खाल्ला त्याच स्व. गोपीनाथ मुंडेंच्या पुतण्याला घेऊन राष्ट्रवादीला पुढे जावे लागतेय, अशा शब्दांत आमदार नितेश राणे यांनी सर्वच प्रमुख पक्षांचा समाचार घेतला. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा पक्षाचा कळीचा मुद्दा असणार, असे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले. आरक्षणावर लवकर निर्णय झाला नाही तर मराठ्यांना तिसरा डोळा उघडावा लागेल, असा इशारा दिला.



महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे पहिल्यांदाच शहरात येत असून रविवारी त्यांची सिडको एन- ७ येथील मैदानावर सभा होत आहे. या सभेच्या तयारीसाठी नितेश राणे एक दिवस आधीच शहरात आले होते. पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना त्यांनी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या प्रमुख विरोधी पक्षांचा समाचार घेतला. ते म्हणाले, काँग्रेस ही महाराष्ट्राची राहिली नाही तर फक्त नांदेड प्रदेश काँग्रेस झाली आहे. त्यामुळेच राज्यात काँग्रेसला अपयश आले. राजस्थानात जनाधार असलेल्या लोकांकडे प्रचाराची धुरा दिल्याने तेथे काँग्रेसला यश आले. महाराष्ट्रात नांदेड सोडून विचार केला तर चित्र बदलेल, असेही ते म्हणाले.



शिवसेनेची भूमिका आता लेचीपेची झाली आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हे हां किंवा ना अशी थेट भूमिका घेत, परंतु आता उद्धव ठाकरे हे मधली भूमिका घेत आहेत. त्यामुळेच ते पक्षातून बाहेर पडत नाहीत. उद्धव ठाकरे म्हणजे रंग दिलेला वाघ असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुन्या नेत्यांना काहीही पदे दिली जात नाहीत. स्व. मुंडे आणि शरद पवार यांचे कधीही जमले नाही. त्याच मुंडे यांच्या पुतण्याला मोठे पद देऊन पवार पक्ष चालवताहेत.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.