नंदुशेठ यांच्या उपोषणास्त्राने भाजप घायाळ तर शिवसेनेच्या बाणाने निशाणा साधला सचिन मुळूक यांची मुरब्बी राजकारण्याप्रमाणे शिष्टाई!

बीड (प्रतिनिधी) केज मतदार संघातील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते नंदुशेठ मुंदडा यांनी लोकहिताच्या मागण्यांसाठी उपोषणाचे हत्यार उपसले. चार दिवसाच्या उपोषण प्रक्रियेतील घडामोडी उल्लेखनीय तशाच मतदार संघातील राजकीय घडामोडींवर परिणाम करणार्‍या ठरल्या. नंदुशेठ यांच्या खांद्याला खांदा लावत त्यांचे पुत्र अक्षय मुंदडा देखील रस्त्यावर उतरले. अंबाजोगाईसह केजमध्ये उमटलेले पडसाद, आंदोलनाभोवतीचा गराडा आणि पाठींब्याचा पाऊस हे मुंदडा पिता-पुत्रांची ताकद अधोरेखीत करणारा ठरला. नंदुशेठ यांच्या उपोषणाने मतदारसंघातील भाजपा पुरती घायाळ झाली असुन शिवसेनेने मात्र त्यावर राम‘बाण’ उपाय शोधुन मित्र पक्षावर ‘निशाणा’ साधण्याची संधी सोडली नाही. दरम्यान या सर्व प्रक्रियेत सेनेचे नुतन जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांची शिष्टाई आणि मध्यस्थी एखाद्या मुरब्बी राजकारण्यांप्रमाणेच ठरली.
अंबाजोगाई आणि परिसरातील जनसामान्यांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी पाठपुरावा करून करून सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी थेट बेमुदत उपोषण सुरू केले. शासन आणि प्रशासन दखल घेत नसल्याने नंदुशेठ यांनी स्व.विमलताई मुंदडा विचार मंचच्या माध्यमातून त्यांनी पुकारलेला एल्गार मैलाचा दगड ठरला. चार दिवसाच्या त्यांच्या उपोषणामध्ये समर्थकांनी त्यांच्या पाठीशी उभी केलेली ताकद त्यांना बळ देणारी ठरली. चार दिवसाच्या उपोषण प्रक्रियेदरम्यान ठिकठिकाणी झालेले आंदोलन, ग्रामपंचायतीचे ठराव आणि उमटलेले पडसाद या सर्व घटना मतदार संघाच्या राजकीय घडामोडींवर परिणाम करणार्‍या ठरल्या. अक्षय मुंदडा यांनीही स्वत: रस्त्यावर ठिय्या मांडून भाजप आमदाराविरूध्द सामान्यांचा रोष व्यक्त केला. उपोषणादरम्यान घडलेल्या घडामोडी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने मागण्यांकडे फिरवलेली पाठ यामुळे मतदारसंघाच्या भाजप आमदार यांच्याविरूध्द सामान्यातील नाराजी प्रामुख्याने दिसून आली. मतदारसंघातील प्रतिष्ठीत आणि मातब्बर व्यक्ती चार दिवसांपासून सामान्यांच्या प्रश्‍नावर उपोषणाला बसूनही स्थानिक आमदारांना ते महत्वाचे का वाटू नये? असा प्रश्‍न आता उपस्थिती होवू लागला आहे. एकूणच भाजपने या सर्व प्रकाराकडे राजकारण म्हणूनच पाहिले की काय? असाही प्रश्‍न विचारला जावू लागला आहे. मुंदडांच्या उपोषणास्त्राने मतदारसंघातील भाजप पुर्णपणे घायाळ झाल्याचे चित्र चार दिवसात पहायला मिळाले. त्या तुलनेत शिवसेनेच्या जिल्हा नेत्यांनी दाखवलेली तत्परता उल्लेखनीय ठरली. नुतन जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, माजी मंत्री बदामराव पंडित आणि सहसंपर्कप्रमुख माजी आ.सुनिल धांडे स्वत: अंबाजोगाईत ठाण मांडून होते. घायाळ भाजपला बॅकफुटवर आणण्याची आयतीच संधी मिळाल्याचा शिवसेनेने पुरेपूर फायदा घेतल्याचे काल दिसून आले. सचिन मुळूक यांनी एखाद्या मुरब्बी राजकारण्यांप्रमाणे मध्यस्थी करत थेट आरोग्यमंत्री दिपक सावंत यांच्याशीच नंदुशेठ यांची चर्चा घडवून आणली. प्रलंबीत मागण्यांसंदर्भात मंत्री सावंत यांना आश्‍वस्त करण्यास करण्यास भाग पाडले. यातून सचिन मुळूक यांचे नेतृत्वही झळाळले.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.