वाळु वाहतुक करणार्‍या ट्रॅक्टरने दोघांना चिरडले एकाचा मृत्यू; संतप्त जमावाने महामार्ग अडविला; तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

गेवराई (प्रतिनिधी) अवैध वाळु उपसा करून त्याची वाहतुक करणार्‍या ट्रॅक्टरने मोटारसायकल स्वारांना चिरडल्याची घटना रात्री कोल्हेरजवळ घडली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. सदरिल घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग अडविला. यामुळे तासभर वाहतुक ठप्प झाली होती. अवैध वाळु वाहतुक करणार्‍या ट्रॅक्टर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. दरम्यान प्रशासन वाळु माफियांची पाठराखन करीत असल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको करत असतांना एका तरूणाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली.
गेवराई तालुक्यातील रेवकी येथील अशोक मिठ्ठुबा थोरात (४५) व अंजीनाथ बाबुराव बाबरे (४०) हे दोघेजण मोटारसायकल क्र.(एम.एच२३ एव्ही ५८०४) वरून गेवराईकडून गावाकडे जात होते. त्याचवेळी समोरून वाळु घेवून येणार्‍या ट्रॅक्टरने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात अंजीनाथ बाबरे हा जागीच ठार झाला तर अशोक थोरात हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. आज सकाळी संतप्त ग्रामस्थांनी गेवराई-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग अडवून अवैध वाळु उपसा थांबवण्याची मागणी केली त्यामुळे तासभर वाहतुक ठप्प झाली होती. प्रशासन वाळु माफियांवर कारवाई करीत नसल्याने वाळुची वाहतुक केली जात आहे. त्यामुळेच हा प्रकार धडल्याचा आरोप करत एका तरूणाने रास्ता रोको स्थळी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.