कॉ.गोविंद पानसरे हत्याप्रकरण: वीरेंद्र तावडेला न्यायालयाकडून जामीन मंजूर

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील संशयित वीरेंद्र तावडे याला मंगळवारी न्यायालयाकडून २५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. जून २०१६ पासून तो पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र, पोलिसांना न्यायालयात त्याच्याविरोधात सबळ पुरावे सादर न करता आल्यामुळे अखेर कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. यामुळे पोलिसांच्या तपासाविषयी पुन्हा शंका उपस्थित झाल्या आहेत. जामीन मंजूर करताना न्यायालयाने वीरेंद्र तावडेला काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार वीरेंद्र तावडेला त्याचा पासपोर्ट न्यायालयाकडे जमा करावा लागणार आहे. तसेच त्याला कोल्हापूरात जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. साक्षीदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये, तसेच दर शनिवारी विशेष तपास पथकासमोर हजेरी लावावी, असे आदेशही वीरेंद्र तावडेला देण्यात आले आहेत. मात्र, समीर गायकवाड पाठोपाठ तावडेला जामीन मंजूर झाल्याने या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर तीन वर्षांपूर्वी कोल्हापुरात गोळीबार करण्यात आला होता. या संपूर्ण हल्ल्याचा कट वीरेंद्र तावडे याच्या मालकीच्या ट्रॅक्स मध्ये शिजल्याचा संशय तपास यंत्रणांना होता. ही ट्रॅक्स पोलिसांनी वाशीम येथून जप्त करण्यात आली. या संशयाच्या आधारे पोलिसांनी वीरेंद्र तावडेला ताब्यात घेतले होते. त्यानंतर सरकारी वकिलांकडून वीरेंद्रसिंह तावडे हाच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमागील मास्टरमाइंड असल्याचा दावाही वेळोवेळी करण्यात आला होता. पानसरेंची हत्या झाली त्यादिवशी तावडे आणि समीर गायकवाड या दोघांमध्ये मोबाइलवरून संभाषणही झाले आहे. त्याच्याविरोधात भक्कम पुरावे असल्याने कोर्टाने जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद मध्यंतरी सरकारी वकिलांनी केला होता. तावडेनेच सारंग आकोलकर आणि विनय पवार या दोघांना गुन्ह्यासाठी तयार केले, असा दावाही सरकारी वकिलांनी केला होता. मात्र, या गोष्टी न्यायालयात सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आले. त्यामुळे न्यायालयाने आज वीरेंद्र तावडे याला जामीन मंजूर केला

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.