मोनाच्या खुनाच्या आदल्या रात्री नेमके काय घडले ?

उस्मानाबाद - पत्नीच्या खून प्रकरणी अटकेत असलेले येरमाळा पोलीस स्टेशनचे सपोनि विनोद चव्हाण चांगले पोलीस अधिकारी होते, ते असे कृत्य करू शकत नाहीत, असे चित्र एकीकडे रंगवले जात असले तरी, मयत मोनाच्या आई - वडिलांची बाईट ऐकली तर नक्कीच संशयाला जागा आहे आणि माणूस वरून कितीही चांगला वागत असला तरी घरी मात्र तो सैतानासारखा वागतो,असे समोर आले आहे.येरमाळा पोलीस स्टेशनचे सपोनि विनोद चव्हाण हे मूळचे बीड जिल्ह्यातील चौसाळा गावचे. त्यांचा विवाह पोलीस खात्यातच असलेल्या शशांक पवार ( सध्या शिरूर कासार ) यांची कन्या मोना हिच्याबरोबर 28 नोव्हेंबर 2014 रोजी झाला होता.मोना ही दिसायला खूप सुंदर आणि हुशार,  त्यामुळे समाजातील काही वाईट नजरा तिच्याकडे पडत होत्या, त्यावरून सपोनि विनोद चव्हाण तिच्यावर संशय घेत होते, असे मोनाच्या आईचे म्हणणे.

मोना साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती तर विनोद हा तिला  साडी घालू देत नव्हता, फक्त पंजाबी ड्रेस घाल म्हणत होता, इतकेच काय तर शेजाऱ्यांकडे जाऊ देत नव्हता, त्यामुळे मोनाचा कोंडमारा होत होता.

त्या रात्री काय घडले ?

सपोनि विनोद चव्हाण हे 24 जानेवारी रोजी मिटिंगनिमित्ताने औरंगाबादला गेले होते, ते रात्री 12 वाजता येरमाळामध्ये आले, तत्पूर्वी त्यांनी मोनाला फोन केला होता, मात्र मोनाने फोन रिसिव्ह केला नाही, बराच वेळा फोन करूनही मोनाने फोन रिसिव्ह न केल्यामुळे त्यांचा संशय बळावला, घरी जाताच त्यांनी यावरून मोनाशी भांडण सुरू केले,घरी कोण होते, तू कोणासोबत झोपली होतीस असे म्हणून चारित्र्यावर संशय घेतल्याने मोना चिडली, दोघांत बराच वेळ भांडण सुरू होते.

साडी घालू न देणे, शेजारी पाजारी यांच्याकडे जाऊ न देणे त्यात चारित्र्यावर संशय आणि हुंड्यातील पाच लाखाचा तगादा यामुळे उभय पती - पत्नीत सतत भांडण होत होते, त्यात 25 जानेवारी रोजी सकाळी विनोदने घटस्फोटाची मागणी केली , त्यामुळे पुन्हा भांडण सुरू झाले आणि यातून मोनाची गोळी झाडून हत्या करण्यात आली, असे मोनाच्या आईचे म्हणणे.२४ जानेवारी रोजी रात्री  नेमके काय घडले हे मोनाने आपणास फोन करून सांगितले होते,मी इतकी चांगली वागूनही पती का संशय घेतो, असा प्रश्नही तिने केला होता, असेही तिच्या आईने सांगितले.

 प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

विनोद चव्हाण यास खुनाच्या आरोपातून वाचवण्यासाठी अनेक बडे पोलीस अधिकारी प्रयत्नशील होते, आता मोना परत येणार नाही, कश्याला गुन्हा दाखल करता म्हणून सांगत होते, तसेच तपासकामी सहकार्य करीत नव्हते, असे मयत मोनाचे वडील शशांक पवार यांचे म्हणणे.आत्महत्या असेल तर छातीच्या खाली गोळी कशी लागते, आरपार कशी घुसते, असा सवाल करून 30 वर्ष पोलीस खात्यात सेवा करूनही उपेक्षा पदरी पडत असल्याचे पवार म्हणाले.

सध्या शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये हेड कॉन्स्टेबल तथा सहायक पोलिस उपनिरीक्षक असलेले पवार मुलीच्या खुनामुळे हतबल दिसले, त्यात आरोपीला शिक्षा करण्याऐवजी वरिष्ठ पोलीस अधिकारी कसे अभय देत होते, हे सांगत होते.उस्मानाबादहुन औरंगाबादला बदलून गेलेली एक वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी तर सतत फोन करून,विनोद चव्हाण यास वाचवण्यासाठी धडपडत होती, असेही पवार यांनी सांगितले.

गोळी कुठे लागली

पोलीस अधिकाऱ्यांनी घरी किंवा शरीरापासून बंदूक वेगळी ठेवताना त्यात गोळ्या न भरता म्हणजे अनलोडेड ठेवावी, असा संकेत आहे. विनोद आणि त्यांच्या पत्नीत सतत भांडण होते होते ते त्यांनी बंदूक लोडेड कशी ठेवली ? यावरून संशयाची पाल चुकचुकत आहे.

त्याच बरोबर आत्महत्या करणारा माणूस गोळी फार तर डोक्यात मारून घेतो, मग छातीच्या खाली कशी गोळी बसली आणि आरपार कशी गेली हे नक्कीच संशयास्पद आहे आणि मोनाच्या आई वडिलांच्या म्हणण्यात तथ्य आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे.

 

मोनाच्या खुनामागे फक्त हुंडा हे कारण पुरेसे नाही तर सतत चारित्र्याचा संशय घेणे, हे देखील आहे.मुलं होत नाही म्हणून ती निराश होती, हे थोतांड आहे, रचलेली खोटी कहाणी आहे, असे मोनाच्या आई आणि वडिलांचे  म्हणणे.

मोनाच्या खून प्रकरणी अनेक वरिष्ठ अधिकारी  विनोद चव्हाण यांच्या बाजूला असल्याने तपास योग्य रीतीने होत नाही. आरोपी कायद्याच्या कचाट्यातून सुटावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असा आरोपही मोनाच्या आई वडिलांनी केला आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.