बीडमध्ये गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न

 
पोलिसांनी पाठलाग करुन टोळीच्या गाडीला समोरुन डॅश मारला; जिपसह साहित्य जप्त; पळून गेलेल्या पाचपैकी दोघांच्या मुसक्या आवळल्या
बीड, (प्रतिनिधी):- गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शहरातील राजीव गांधी चौकात रात्री घडली. घटनेची माहिती कळताच डिवायएसपी सुधीर खिरडकर यांनी मार्शल पेट्रोलिंगला अलर्ट करत सर्व ठाणे प्रमुखांनाही सूचना केल्या. घटनेचे गांभीर्य पाहता काही तासातच यंत्रणा हलली आणि एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणार्‍या टोळीच्या गाडीचा पाठलाग सुरु केला. नवगण राजुरीजवळ पोलिसांच्या गाडीने टोळीच्या टाटासुमोला ओव्हरटेक करत समोरुन डॅश मारुन त्यांना रोखताच गाडीतील पाचही चोरटे फरार झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धस पिंपळगाव (ता.पाटोदा) शिवारातून पाच पैकी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
बीड शहरातील राजीव गांधी चौकात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चार ते पाच जणांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी चोरट्यांनी काही लोकांना तेथून जातांना पाहताच त्यांनी गॅस कटरने अर्धवट कट केलेले एटीएम त्याचठिकाणी टाकून पळ काढला. याची माहिती डिवायएसपी सुधीर खिरडकर यांना मिळताच त्यांनी मार्शल पेट्रोलिंगला अलर्ट करत सर्व ठाणे प्रमुखांना सूचना केल्या. स्वत: घटनास्थळी भेट देवून पाहणी करत आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली. ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोना.लोणके, एएसआय.एकाळ, भुतेकर, चालक एएसआय. रशिद खान यांच्या टीमने नगर रोडवरुन एका टाटासुमोचा पाठलाग सुरु केला. पोलिस मागे असल्याने टाटासुमो थांबत नसल्याचे पाहून पोलिसांच्या गाडीने टाटासुमोला ओव्हरटेक केले आणि समोरुन चोरट्यांच्या गाडीला डॅश मारला.  टाटासुमो थांबताच त्यामधील पाचही चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले. ग्रामीण पोलिसांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेला माहिती दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी टाटासुमोतून फरार झालेल्या पाचपैकी दोघांना धस पिंपळगाव (ता.पाटोदा) शिवारातून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी सुरु असुन इतर तिघांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात टाटासुमो (क्र.एमएच.१२ ईएन.५९२७) यासह गॅस कटर, सिलेंडरसह अन्य साहित्य जप्त केले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला आहे.
डिवायएसपी खिरडकरांनी काही मिनिटातच यंत्रणा हलविली; पोलिस कर्मचार्‍यांचीही सतर्कता
बीड शहरातील राजीव गांधी चौकात एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती डिवायएसपी सुधीर खिरडकरांना मिळाली. काही मिनिटातच त्यांनी मार्शल पेट्रोलिंगला अलर्ट करत अन्य पोलिस पथकालाही सूचना दिल्या. चोरट्यांची टोळी टाटासुमोमधुन राजुरीच्या दिशेने जात असल्याची माहिती कळताच खिरडकर यांनी ग्रामीण ठाण्याच्या कर्मचार्‍यांना त्यांच्या मागावर लावले. ग्रामीण ठाण्याच्या कर्मचार्‍यांनीही जिवाची पर्वा न करता चोरट्यांची टाटासुमो थांबत नसल्याचे पाहून ओव्हरटेक करुन समोरुन डॅश मारला. चोरटे फरार झाले असले तरी त्यातील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांनी धस पिंपळगावजवळ पकडले.या प्रकरणामध्ये डिवायएसपी खिरडकर यांनी काही मिनिटातच यंत्रणा हलविल्याने आणि सर्व कर्मचार्‍यांनीही सतर्कता दाखवत केलेली कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे.
 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.