आ.क्षीरसागर यांच्यामुळे राज्यातील साडे नऊशे मानसेवी शिक्षकांना दिलासा

मराठी भाषा फाउंडेशन अंतर्गत पुनर्नियुक्तीचा प्रश्‍न मार्गी; शिक्षण मंत्र्यांकडून प्रक्रिया पुर्ण करण्याच्या सूचना
बीड, (प्रतिनिधी):- शासनाच्या मराठी भाषा फाउंडेशन वर्ग योजनेतर्ंगत उर्दू शाळांमध्ये मानधन तत्वावर मराठी भाषा शिकविण्यासाठी मानसेवी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मागील शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालयाने नव्याने पत्राद्वारे मानसेवी शिक्षकांना मराठी विषय असणे बंधनकारक केले होते. या निर्णयामुळे पुनर्नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील ९३० मानसेवी शिक्षकांना फटका बसला होता. या प्रश्‍नी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी मानसेवी शिक्षकांचा प्रश्‍न शिक्षणमंत्र्यांपुढे मांडून त्यांना न्याय देण्याची आग्रही मागणी केली. त्यावर शिक्षणमंत्र्यांनी मराठी विषयाची अट अंशत: शिथील करत संबंधित शिक्षकांना पुनर्नियुक्ती देण्याच्या सूचना केल्या आहेत. संबंधित मानसेवी शिक्षकांना दोन वर्षाची मुदत देण्यात आली असुन त्या कालावधीत त्यांना मराठी विषय घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
राज्यात मराठी भाषा फाउंडेशन वर्ग योजनेतर्ंगत ९३० शिक्षक कार्यरत आहेत. सदरील शिक्षकांना मानसेवी शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली असुन त्यांना पाच हजार रुपये प्रतिमाह मानधन दिले जाते. मागील सहा ते सात वर्षांपासुन उर्दू माध्यमिक शाळांमध्ये सदरील योजनेतर्ंगत शिक्षक कार्यरत असुन या संदर्भात अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालयाने दि.७ जून २०१७ रोजी पत्र काढून मराठी भाषा फाउंडेशन वर्ग अंतर्गत मानसेवी शिक्षकांना पदवी, पदव्युत्तर पदवी, व्यवसायिक पदवी यापैकी किमान एका स्तरावर मराठी विषय बंधनकारक केला होता. या पत्रामुळे राज्यातील ९३० शिक्षकांची पुनर्नियुक्ती एक वर्षापासुन रखडली होती. या संदर्भात मानसेवी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष ऍड.सय्यद खाजा यांनी आ.जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे पाठपुरावा करुन हा प्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत अल्पसंख्यांक व शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यापुढे हा मुद्दा मांडून ९३० शिक्षकांचा प्रश्‍न मार्गी लावण्याची आग्रही मागणी केली. तावडे यांनी त्याची दखल घेत अल्पसंख्यांक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांना सूचना देवून सदरील अट अंशत: शिथील करुन संबंधित ९३० शिक्षकांना पुनर्नियुक्ती देण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. तसेच संबंधित मानसेवी शिक्षकांना २ वर्षाचा अवधी देण्यात आला असुन या कालावधीत त्यांनी पदवीसाठी मराठी विषय घेऊन उत्तीर्ण व्हावे असेही स्पष्ट केले आहे.
 
ऍड.सय्यद खाजा यांच्या प्रयत्नांना यश
मराठी भाषा फाउंडेशन वर्ग योजनेतर्ंगत राज्यभरात ९३० मानसेवी शिक्षक कार्यरत आहेत. गेल्या आठ वर्षांपासुन सेवेत असुनही मानसेवी शिक्षकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. यासंदर्भात ऍड.सय्यद खाजा यांनी सर्व शिक्षकांची संघटन बांधणी करत मराठी भाषा मानसेवी शिक्षण संघटनेची नोंदणी केली. मानसेवी शिक्षकांच्या प्रश्‍नावर व्यापक लढा उभारुन पुनर्नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या शिक्षकांचा प्रश्‍न आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून शासन दरबारी मांडला. अनेक वेळा पाठपुरावा करुन निवेदने देवून या प्रश्‍नाकडे लक्ष वेधल्याने काल झालेल्या बैठकीत हा प्रश्‍न मार्गी लागला आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.